तडाखा वाढतोय!; उष्माघातापासून वाचण्यासाठी काळजी घेण्याच्या सूचना
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाचा (summer) तडाखा चांगलाच वाढला आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक वर्षी मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. या काळामध्ये उन्हाची तीव्रता आणि झळा याचा परिणाम आरोग्यावर होतो. त्यामुळे शहरातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. (heat)
सध्या हवामानात बदल झालेला असून शहराचे तापमान खूप वाढत आहे. अशा परिस्थितीत उष्माघाताची शक्यता नाकारता येत नाही. उष्माघातासारख्या जीवघेण्या परिस्थितीतून वाचण्यासाठी दक्ष राहणे गरजेचे आहे. त्याकरिता मार्गदर्शक सूचना करत, याबाबत कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले आहे.
कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, अशा उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.
लक्षणे कोणती?
याच्या लक्षणामध्ये मळमळ, उलटी, हात पायात गोळे येणे, थकवा येणे, ४० डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे, क्वचित लाल होणे, घाम न येणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थ, बेशुद्धावस्था यांचा समावेश आहे.
सुचवलेले उपाय
उष्माघात झाल्यास...
रुग्णाला सावलीत आणि थंड जागी हलवा. हातापायाला गोळे आल्यास तेथील स्नायूला हलका मसाज द्या, थोडे थोडे पाणी प्यायला द्या. उलटी झाली तर पाणी देऊ नका. अंगावरील कपडे सैल करा. ओल्या, थंड फडक्याने अंग पुसत राहावे. थोडे थोडे पाणी पाजत राहा. पुढील उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात हलवा.
उष्माघाताबाबत आवश्यक काळजी रुग्णाच्या नातेवाईकांनी घेणे आवश्यक आहे. यावर उपचारासाठी औषधोपचार व मनुष्यबळ महापालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे.
— डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.