संग्रहित छायाचित्र
महापालिकेच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेच्या बैठकीला नेहमी लेट येणा-या अधिका-यांची नावे घेवून त्यांना आयुक्तांनी सक्त ताकीद दिली असून एकवेळ संधी दिली आहे. यापुढे बैठकीला वेळेवर न आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा तंबी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे. त्यामुळे इतर लेटलतिफ असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती, सर्वसाधारण सभा आणि विभाग प्रमुखांची बैठक आठवड्याच्या दर (मंगळवारी) घेण्यात येते. या बैठकीत शहरातील विविध विकास कामांसह त्यांच्या आर्थिक खर्चाला मंजूरी देण्यात येते. त्यामुळे या सभेला महापालिकेतील सर्व विभाग प्रमुख, स्थापत्यचे कार्यकारी अभियंता उपस्थितीत असतात. स्थायी समिती व सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी आयुक्त शेखर सिंह हे असतात. मात्र, स्थायी व सर्वसाधारण सभेच्या बैठकीला महापालिकेतील अधिकारी हे सतत उशिरा येत आहेत. वारंवार सुचना देवून देखील अधिकाऱ्यांच्या वर्तनात बदल होत नाही. त्यामुळे मंगळवारी (दि.१७) रोजी झालेल्या बैठकीला उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे आयुक्तांनी स्वीय सहायकांना घेण्यास सांगितले. त्या अधिकाऱ्यांची नावे वहीत घेत तशी नोंद करण्यात आली. त्या अधिकाऱ्यांची नावे महापालिकेच्या विभागप्रमुखांच्या ग्रुपवर टाकून त्यांना यापुढे उशिरा आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त सिंह यांनी दिला आहे. त्यामुळे लेटलतीफ अधिकाऱ्यांची नावे जाहीर करुन सक्त ताकीद दिल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.
अधिकाऱ्यांची नावे सोशल मीडियावर
महापालिकेच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह हे वेळेवर उपस्थित होते. मात्र, आयुक्त हे बैठकीला उपस्थित राहूनही अनेक वरिष्ठ अधिकारी गैरहजर होते. त्यांना वारंवार सुचना करूनही वेळेवर उपस्थित राहत नसल्याचे दिसून आले. यामध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, मुख्य वैदयकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे, उपायुक्त मनोज लोणकर, सिताराम बहूरे, सहायक आयुक्त मुकेश कोळप, श्रीकांत कोळप, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, राजेंद्र जावळे, दिलीप धुमाळ, विजयसिंह भोसले, मनोहर जावरानी, सुनिल भगवानी, तर उपअभियंता किरण अंधूरे, राजकुमार सुर्यवंशी, स्वप्नील शिर्के, प्रकाश कटोरे, मोहन खोंद्रे, ओमप्रकाश बहिवाल, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप या सर्व अधिकाऱ्यांना आयुक्तांनी सक्त ताकीद देत एकवेळ संधी दिली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.