अखेर 'त्या' बीआरटी मार्गावरील खड्डे बुजवले
पिंपरी-चिंचवड: शहरातील विविध बीआरटी मार्गांवर स्थानकांलगत ८३ सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यासाठी खोदकाम सुरू आहे. मात्र या खोदकामानंतरच्या दुरुस्तीचे काम राहून गेले होते. दरम्यान 'सीविक मिरर' ने ९ मार्च रोजी 'बीआरटी मार्गावर 'स्मार्ट' खड्डे' या मथळ्याद्वारे या समस्येला तोंड फोडले होते. त्यानंतर 'स्मार्ट सिटी' ने या वृत्ताची दाखल घेत संबंधित ठिकाणचे खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला. शाहूनगर, पूर्णानगर या ठिकाणी केलेल्या खोदकामांनंतरचे खड्डे अखेर बुजवण्यात आले. तसेच, या मार्गावरील इतर खड्डे बुजवण्याचे आणि सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने दुजोरा दिलेला आहे. (PCMC News)
'स्मार्ट सिटी' प्रशासनाकडून या मार्गाची तातडीने डागडुजीचे काम हाती घेण्यात आले. दोनच दिवसांनंतर खड्डा डांबर टाकून पूर्णपणे बुजवण्यात आलेला आहे.
काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी बीआरटी मार्गावरील शाहूनगर, केएसबी चौक, पूर्णानगर या ठिकाणी बस थांब्यालगत जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम केले होते. मात्र त्यानंतर खड्डे पूर्णपणे बुजवण्यात न आल्याने या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला होता. बीआरटी स्थानकांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि मार्गात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी बसथांब्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. मात्र, त्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे हा मार्ग अधिकच धोकादायक झाला होता. मात्र आता या मार्गावर सर्वच ठिकाणांचे खड्डे बुजवण्यात आलेले आहेत. तसेच, मार्गावर पडलेली बारीक खडी आणि वाळू तेथून उचलण्यात आलेली आहे.
दरम्यान, जुन्या पुणे-मुंबई मार्गावरील दापोडी ते निगडी या मार्गातील कॅमेरे बसवण्यासाठी रस्त्यावर चर पाडली आहे. त्या ठिकाणीही दुरुस्ती करण्यात आली आहे. इतर बीआरटी मार्गावर खोदकाम झाल्यानंतर ते खड्डे लगेच बुजवण्यात येतील, अशी माहिती येथे काम करण्यात येत असलेल्या ठेकेदाराने दिली.
मार्गावर सुशोभीकरण व रंगरंगोटी
बीआरटी मार्गावर रंगरंगोटी करण्यात येत असून, बीआरटी थांबा मार्गावर ब्लॉक बसवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मार्गावरील इतर खड्डे आणि धोकादायक केबल्स हटवण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील समस्या राहणार नाहीत, अशी माहिती महापालिकेच्या बीआरटी विभागाकडून देण्यात आली.
चिखली स्पाइन रस्त्यावर रोज सकाळी व्यायामासाठी येतो. या ठिकाणी बीआरटी मार्गावर तसेच, लगतचा मुख्य रस्ताही खोदलेला आढळला. आता मात्र, रस्ता व्यवस्थित करण्यात आला आहे. डांबराचा थर किती दिवस टिकेल हा सुद्धा प्रश्नच आहे.
-सुधीर पाचपुते, ज्येष्ठ नागरिक, शाहूनगर
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.