पिंपरी-चिंचवडच्या अधिकाऱ्यांना पुण्याचा लळा
रोहित आठवले
वाढत्या शहराची गरज लक्षात घेऊन स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची (Pimpri-Chinchwad Police Commissionerate) निर्मिती करण्यात आली. मात्र, येथील पोलीस अधिकाऱ्यांना पुण्याचाच लळा फार असल्याचे दिसून आले आहे. निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांची घरे पुणे (Pune) शहराच्या हद्दीत असल्याने गुन्हा घडल्यास किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास घटनास्थळी पोहोचण्यास त्यांना विलंब होताे. यामुळे अधिकाऱ्यांनी आयुक्तालयाच्या हद्दीतच आपले निवासस्थान राहील याची खबरदारी घ्यावी, असा इशारा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (Commissioner of Police Vinay Kumar Choubey यांनी दिला आहे.
पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्त होण्यापूर्वी शहराचा परिसर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत होता. निरीक्षक झाल्यानंतर तसेच सहायक आयुक्त असताना अनेक अधिकाऱ्यांनी मुलांच्या शिक्षणाच्या सोयीच्या दृष्टिकोनातून स्वतः राहण्यासाठी पुणे शहराला पसंती दिली. मात्र, स्वतंत्र आयुक्तालय झाल्यानंतर शहरातील अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र पोलीस वसाहती नाहीत. पुणे शहराच्या आयुक्त, सह आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त तसेच सहायक आयुक्त, निरीक्षक यांच्यासाठी शासकीय निवासस्थाने आहेत.
पिंपरी-चिंचवडसाठी आयुक्तालय झाल्यावर पुण्यातून अनेक अधिकारी पिंपरी-चिंचवडमध्ये बदली होऊन आले आहेत. त्यामुळे हे अधिकारी राहण्यासाठी पुण्यात, तर नोकरीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये येतात. शहरात रात्री एखादी घटना घडल्यास या अधिकाऱ्यांना पुण्यातून पिंपरी-चिंचवडमध्ये यावे लागते.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची हद्द पुन्हा आयुक्तालयाच्या हद्दीच्या तुलनेत भौगोलिकदृष्ट्या खूप मोठी आहे. शहरात नियुक्ती होताना अन्य जिल्ह्यातून आलेल्या अधिकाऱ्यांनी आपल्या निवासस्थानासाठी पिंपरी-चिंचवड मधील घरे भाडेतत्त्वावर घेतली आहेत. ज्या अधिकाऱ्यांची पुण्यातून पिंपरी-चिंचवडला बदली झाली आहे अशांची घरे पुणे शहरात आहेत.
पिंपरी-चिंचवडला सध्या नियुक्तीला असणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी सह आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, पाच उपायुक्त, आठ पैकी ४ सहायक आयुक्त आणि ५० निरीक्षकांपैकी निम्म्यांची घरे पुणे शहरात आहेत. स्वतः आयुक्त सध्या खासगी तत्त्वावर पिंपरी- चिंचवडमध्ये फ्लॅट भाडे तत्त्वावर घेऊन राहात आहेत. परंतु, अन्य अधिकाऱ्यांची मुले शिक्षणासाठी पुण्यात असल्याने हे अधिकारी सुरुवातीपासून पुण्यातच राहात आहेत.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शहरातील पाच पोलीस वसहतींपैकी अर्ध्या वसाहती या राहण्यायोग्य नाहीत. त्यामुळे अनेकांना घरे भाडेतत्त्वावर घेऊन राहावे लागत आहे. त्याचबरोबर अनेक पोलीस कर्मचारी हे पुणे शहरातील वसाहतीत राहण्यास आहेत.
आयुक्तालय उभारताना निम्याहून अधिक इमारती या महापालिकेकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. यामध्ये आयुक्तालय, उपायुक्तालय, अनेक पोलीस ठाणी, गुन्हे शाखेचे कार्यालये भाडेतत्त्वावर घेण्यात आले आहे.
शहरात सध्या अधिकाऱ्यांना राहता येतील अशी छोटी निवासस्थाने (वन बीएचके फ्लॅट) असलेल्या शासकीय तीन इमारती आहेत. पण या ठिकाणी राहणारे अनेक अधिकारी हे पुण्यात नियुक्तीस आहेत. त्यामुळे प्रथम शासकीय निवासस्थाने उपलब्ध करून द्यावीत. त्यानंतर शहरात मुक्काम करण्याचे बंधन करावे असा सूर आता अधिकाऱ्यांमधून निघू लागला आहे. दरम्यान, निरीक्षक, सहायक आयुक्त, उपायुक्त यांच्या कार्यालयात निवासाची व्यवस्था आहे. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशामुळे कार्यालयातच मुक्कम करण्यास सुरुवात केली आहे. थेट आयुक्तांचे आदेश आल्याने यावर अधिकृतपणे बोलण्यास नकार देत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.