File Photo
लेबर कॅम्पमध्ये राहणार्या मजुरांसाठी दोन दिवसांपूर्वीच बांधलेला पाण्याची टाकी फुटून मलब्याखाली सापडून पाचमजुरांच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी लेबर कॅम्प उभारणार्या कंपनी मालकाला भोसरी पोलीसांनी शुक्रवारी (दि. २५) गजाआड केले. त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
कुमार लोमटे असे अटक केलेल्या कंपनी मालकाचे नाव आहे. नवीन जोन्ना (वय ४७, मुळ - ओडिशा), माल्ला महाकूर (वय ४५, मूळ - ओडिशा), सोनू कुमार (वय २४, मूळ - झारखंड), रवींद्र कुमार (वय २०, मुळ - बिहार), सुदाम बेहरा (सर्व रा. लेबर कॅम्प, सदगुरूनगर, भोसरी) अशी मृत्युमुखी पडलेल्या पाच
मजुरांची नावे आहेत. तर, संतोषकुमार रामनरेश सहानी, शिवजतन निषाद, मुन्ना रमेश चौधरी, मोहम्मद सलीम मंगरू शेख, जितेंद्रकुमार मंडल, महंमद हरून रशीद अशी जखमींची नावे आहेत. जखमी मजुरांवर भोसरीतील खासगी रूग्णालयात
उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थीर असल्याचे भोसरी ठाण्याचे वरिष्ठपोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण यांनी सांगितले.
एनसीसीएल कंपनीच्या वतीने बांधकाम प्रकल्प उभारण्यात येतात. या प्रकल्पांवर मजुर कामाला आहेत. या मजुरांना राहण्यासाठी शहराच्या विविध भागात लेबर कॅम्प उभारण्यात आले आहेत. एनसीसीएल कंपनीने लेबर कॅम्प उभारण्याचे काम विनायक इंडस्ट्रीयल सर्व्हीसेस या कंपनीला दिले आहे. आरोपी लोमटे हा कंपनीचा मालक आहे.
भोसरीतील सदगुरुनगरमध्ये या मजुरांना राहण्यासाठी ४० खोल्या बांधण्यात आल्या आहेत. कामगारांना रोजच्या वापरासाठी दोन दिवसांपूर्वी पाण्याची टाकी बांधण्यात आला होता. मात्र, कुशल कामगाराकडून हौदाचे बांधकाम करून घेतले नाही. तसेच, बांधकाम निकृष्ट दर्जाचे व कच्चे आहे हे माहिती असताना हौदामध्ये पाणी भरून निष्काळजीपणे वापरात आणली. गुरूवारी सकाळी सहाच्या सुमारास काही मजुर टाकीच्या नळाखाली आंघोळ करत असताना टाकी अचानक पडली. त्याखाली दबून पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर, सहा मजुर गंभीर जखमी झाले.