संग्रहित छायाचित्र
राजकारणाच्या आखाड्यात वस्ताद समजल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची बुधवारी (दि.१३) भोसरीतील गाव जत्रा मैदानावर महाविकास आघाडीचे भोसरी मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्यासाठी सभा होणार आहे. शेवटच्या टप्प्यातील शरद पवार यांच्या सभेने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. भोसरीतील भाजप विरोधात फिरलेल्या वातावरणात ' वस्तादांचा ' डाव भाजप उमेदवाराला गारद केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास महाविकास आघाडीचे भोसरी मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ भोसरीतील गाव जत्रा मैदान येथे सायंकाळी सहा वाजता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमुळे भोसरी मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या संघर्षाला आणखी बळ मिळेल असा विश्वास व्यक्त करून अजित गव्हाणे म्हणाले, "पिंपरी चिंचवड शहराला दूरदृष्टीने विकासाच्या उंचीवर नेण्याचे काम खऱ्या अर्थाने अण्णासाहेब मगर, प्रा.रामकृष्ण मोरे व त्यानंतर शरद पवार यांनी केले. शरद पवार यांनी या शहराला उद्योग नगरी म्हणून या नावारूपाला आणले."
"पिंपरी चिंचवड शहरात पंधरा वर्षे शरद पवार यांची सत्ता होती. या सत्ता काळात आम्हा सदस्यांना बळ देऊन शहराला मेट्रो सिटी पर्यंत नेले. सुसज्ज रस्ते, उड्डाणपूल, उद्याने, पाण्यासाठी विविध योजना आणल्या गेल्या. मात्र गेल्या दहा वर्षात या सर्व नियोजनाची माती करण्याचे काम भाजपने केले आहे. भ्रष्टाचार, दबावतंत्र, ठराविक लोकांना डोळ्यासमोर ठेवून केली जाणारी कामे यामुळे शहरातील प्रत्येक कामात गुणवत्ता ढासळली आहे. या सर्व गोष्टींमुळे पदाधिकाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच नाराज आहेत. नागरिकांना पाणी, खड्डे, आरोग्याच्या अनेक समस्यांनी घेरले आहे. समाविष्ट गावांमध्ये पाणीटंचाईमुळे प्रचंड नाराजी आहे. या नाराजीचे रूपांतर परिवर्तनात होत असल्यामुळे भोसरी मतदारसंघात भाजपचा पराभव अटळ आहे असा विश्वास गव्हाणे यांनी व्यक्त केला आहे."
संपूर्ण महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांचा झंजावात दिसत आहे. शरद पवार यांची जिथे सभा होते तिथे वातावरण फिरते असे चित्र आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघात शरद पवार यांची सभा आम्हा कार्यकर्त्यांना ऊर्जा देतानाच भाजपच्या उमेदवाराला गारद केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे. - अजित गव्हाणे
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.