संग्रहित छायाचित्र
विकास शिंदे
निगडी येथील भक्ती-शक्ती समूहशिल्प चौक ते किवळेच्या मुकाई चौकापर्यंतचा अपूर्ण स्थितीमधील बीआरटीएस उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याने वाहतुकीस खुला करण्यात आला. मात्र, आता अपूर्ण स्थितीतील बीआरटी मार्ग पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी त्या मार्गावर तब्बल १४ कोटींचा खर्च करून हे काम पूर्ण होईल. त्यामुळे वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. (Bhakti Shakti Mukai Chowk BRT)
दहा वर्ष जागा ताब्यात नसल्याने महापालिकेला रावेत येथील उड्डाणपुलाचे उर्वरित काम करता आले नाही. त्यामुळे किवळे मुकाई चौक ते भक्तीशक्ती चौक हा बीआरटी मार्ग धूळखात पडला होता. तब्बल दहा वर्षांनी जागा ताब्यात आल्यानंतर गेल्या महिन्यात पुलाचे काम पूर्ण झाल्याने तो वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.
आता या मार्गावरील बीआरटीचे काम केले जाणार आहे. त्यासाठी स्थापत्य प्रकल्प विभागाने १७ कोटी ३४ लाख ६६ हजार ७२३ रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यासाठी ५ निविदा प्राप्त झाल्या. त्यातील १६ ते २२ टक्के कमी दर असलेल्या ४ निविदा पात्र ठरल्या. क्लिन्सी कन्स्ट्रक्शन प्रा. लि.ची २२.०५ टक्के कमी दराची १३ कोटी ८१ लाख ७३ हजार ७९४ रुपये खर्चाची निविदा स्वीकृत करण्यात आली आहे.
या कामाची मुदत १५ महिन्यांची आहे. कमी दर असल्याने संबंधित ठेकेदाराकडून ३ कोटी ४८ लाख ६७ हजारांची अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम जमा करून घेण्यात आली आहे. या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. दरम्यान, दहा वर्षांनंतर रावेत उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर या बीआरटीएस मार्गावरून वाहतूक रहदारी सुरू झाली आहे. आता रावेत ते किवळे मार्गावरील बीआरटीएस विकसित केला जाणार आहे. त्या कामांमुळे वाहनचालकांची गैरसोय होणार आहे.
तसेच, काही ठिकाणी अद्याप जागा ताब्यात आलेली नाही. त्यामुळे तेथील रस्ता खराब आहे. जागा ताब्यात येईपर्यंत हा संपूर्ण बीआरटी मार्ग पूर्ण होणार नाही. नगररचना विभाग व स्थापत्य विभागात समन्वय नसल्याने ही कामे रखडली आहेत. त्यामुळे वाहनचालकांना आणखी किमान दीड वर्षे चांगल्या मार्गासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.