Bhakti Shakti - Kiwale BRT News: भूसंपादन रखडल्याने लटकला बीआरटी मार्ग!

जुन्या पुणे-मुंबई मार्गावरील निगडीच्य भक्ती-शक्ती चौकातून किवळेतील मुकाई चौकापर्यंतचा बीआरटी मार्ग लटकला आहे. भूसंपादन रखडल्याने हा मार्ग पूर्ण करण्यास अडचणी येत असून मार्गाचे काम अर्धवट स्थितीत आहे.

Bhakti Shakti - Kiwale BRT

संग्रहित छायाचित्र

भक्ती शक्ती चौक- किवळे मार्गाची स्थिती, दहा वर्षांपूर्वी हाती घेतले होते काम

पंकज खोले
जुन्या पुणे-मुंबई मार्गावरील निगडीच्य भक्ती-शक्ती चौकातून किवळेतील मुकाई चौकापर्यंतचा बीआरटी मार्ग (Bhakti Shakti - Kiwale BRT) लटकला आहे. भूसंपादन रखडल्याने हा मार्ग पूर्ण करण्यास अडचणी येत असून मार्गाचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे शहरातील आणखीन एक बीआरटी मार्ग सुरू होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रामुख्याने जुन्या पुणे-मुंबई मार्गावरून शहरात येणारी अवजड वाहने आणि बस बाहेरून तसेच, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भक्ती-शक्ती ते  मुकाई चौक बीआरटी मार्ग विकसित करण्याचे काम महापालिकेने दहा वर्षांपूर्वी हाती घेतले होते. परंतु, या मार्गावरील रावेत येथील रस्त्याचे भूसंपादन करण्यात नगररचना विभागाला अपयश आल्याने पुलाचे काम अर्धवट राहिले. या ठिकाणचा मार्ग अर्धवट स्थितीत आहे. या ठिकाणी सह्याद्री कॉलनी, भीमाशंकर नगर या ठिकाणचे रस्त्याचे काम अपूर्ण आहे.

त्यामुळे या रस्त्यावरील भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक बीआरटी मार्ग अर्धवट स्थितीत आहे. तब्बल दहा वर्षांनी उड्डाणपुलाची जागा ताब्यात घेण्यात नगररचना विभागाला यश आले. त्यानंतर पुलाचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यात आले. आता हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. परंतु, रस्त्यावरील बीआरटी मार्ग अद्यापही धूळखात पडला आहे.

या रस्त्यासाठी १३ कोटी ८१ लाख ७३ हजार ७९४ रुपये खर्चाची निविदा स्वीकृत करण्यात आली. पंधरा महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण करावयाचे आहे. ही प्रक्रिया राबवून बराच कालावधी उलटला तरी बीआरटी विकासकाम अद्याप सुरु करण्यात आले नाही. या कामाला सुरुवात होण्यासच विलंब झाल्याने काम पूर्ण होण्याचा कालावधीही लांबणार आहे. नगररचना विभाग आणि स्थापत्य विभागातील मतभेदामुळे काही तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्या आहेत. सध्या सुरू असलेला रस्ता अपघातामुळे धोकादायक ठरू लागला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केलेली आहे. दुसरीकडे बीआरटीचे काम पुन्हा रखडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रत्यक्ष काम सुरु केलेले नाही. आता बीआरटीचे काम केव्हा मार्गी लागणार असा प्रश्न प्रवाशी उपस्थित करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest