‘मेरी मिट्टी, मेरा देश’साठी पिंपरी पालिकेने केली होती ५० हजार ध्वजांची खरेदी
रोहित आठवले
‘मेरी मिट्टी, मेरा देश’ मोहिमेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने लाखो रुपये खर्च करून ५० हजार कापडी (सिल्क) राष्ट्रध्वजांची थेट खरेदी केली. मात्र, या राष्ट्रध्वजांपैकी तब्बल ३० हजार ध्वज वापराविना गोदामात पडून आहेत. २४ रुपये दराने खरेदी केलेल्या ध्वजांची विक्री केली १० रुपये दराने. १५ ऑगस्टपूर्वी दोन दिवस आधी ध्वज उपलब्ध झाल्याने नागरिकांनी खरेदीकडे पाठ फिरवली.
राष्ट्रध्वजाच्या खरेदीसाठी प्रत्येकी २४ रुपये दराने थेट पद्धतीने १२ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, स्वातंत्र्यदिनाच्या म्हणजे १५ ऑगस्टपूर्वी एक ते दोन दिवस आधी उपलब्ध झालेल्या या झेंड्यांच्या खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने, तसेच, पुरेशी जनजागृती झाली नसल्याने तब्बल ३० हजार ध्वज पडून आहेत. महापालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
‘मेरी मिट्टी, मेरा देश‘ या मोहिमेत भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल १३ ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस घरावर कापडी ध्वज लावण्याचे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शहरवासीयांना केले होते. ऐनवेळेला ‘मेरी मिट्टी, मेरा देश‘ मोहिमेसाठी ध्वजांची मागणी मध्यवर्ती भांडार विभागाकडे करण्यात आली. कमी कालावधी राहिल्याने भांडार विभागाने गेल्या वर्षी खरेदी केलेल्या ठेकेदारांकडून ध्वज थेट खरेदी केले. एकूण ५० हजार ध्वज २४ रुपये दराने खरेदी करण्यात आले.
शहरातील सर्व ८ क्षेत्रीय कार्यालयात ध्वज विक्री केंद्र सुरू केल्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचलीच नाही. या उपक्रमाची महापालिका प्रशासन, क्षेत्रीय कार्यालय तसेच, जनसंपर्क विभागाने जनजागृती मोहीम राबवलीच नाही. यामुळे नागरिकांना ध्वज विक्रीसाठी उपलब्ध आहेत हे समजले नाही. हे राष्ट्रध्वज स्वातंत्र्यदिनाच्या एक ते दोन दिवस आधी सर्व क्षेत्रीय कार्यालयांपर्यंत पोहोचले. आदल्या दिवशी म्हणजे १४ ऑगस्टला क्षेत्रीय कार्यालयात ध्वज विक्रीचे केंद्र सुरू करण्यात आले.
नागरिकांना या उपक्रमाची माहिती नसल्याने सर्व ध्वजांची विक्री झाली नाही. खरेदी केलेले ५० हजार व मागील वर्षीचे शिल्लक २ हजार ८८० ध्वज असे एकूण ५२ हजार ८८० ध्वज कार्यालयात उपलब्ध होते. त्यापैकी केवळ २३ हजार २७८ ध्वजांची १० रुपये दराने विक्री झाली. तब्बल २९ हजार ६०२ ध्वज शिल्लक राहिले आहेत. ते झेंडे आता गोदामात ठेवण्यात आले आहेत. पुढील वर्षी त्या ध्वजांची विक्री केली जाईल, असे उत्तर महापालिकेच्या अधिकार्यांकडून दिले जात आहे. दरम्यान, काही ध्वज आदल्या दिवशी म्हणजे १४ ऑगस्टला ठेकेदाराने उपलब्ध करून दिल्याने त्याची विक्री झाली नसल्याचेही सांगितले जात आहे.
गेल्या वर्षीचे ध्वज असल्याने अल्प प्रतिसाद
‘मेरी मिट्टी , मेरा देश’ या मोहिमेतील घरोघरी तिरंगा या उपक्रमासाठी ५० हजार ध्वज महापालिकेने खरेदी केले. ते क्षेत्रीय कार्यालयनिहाय विक्रीस ठेवण्यास आले होते. गेल्या वर्षी अनेकांनी गठ्ठ्याने ध्वज खरेदी केले. गेल्या वर्षीचे ध्वज असल्याने यंदा नागरिकांनी वैयक्तिक पातळीवर ध्वज खरेदी केले नाहीत. या उपक्रमासंदर्भात स्मार्ट सिटीच्या शहरातील व्हीएमडीवर प्रसिद्ध केली. तसेच, जनसंपर्क विभागानेही जनजागृती केली, असा दावा ‘मेरी मिट्टी, मेरा देश‘ या मोहिमेचे समन्वयक उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी केला आहे.
मागणीनुसार ध्वजांची खरेदी
‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या उपक्रमाअंतर्गत घरोघरी तिरंगा उपक्रमासाठी ५० हजार सिल्कच्या राष्ट्रध्वजांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ध्वज खरेदी करून ते सर्व क्षेत्रीय कार्यालयांना पुरविण्यात आले, असे महापालिकेच्य मध्यवर्ती भांडार विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.