संग्रहित छायाचित्र
तो आपल्या बेपत्ता झालेल्या आईला आळंदीपासून ते बुलढाण्यातील शेगावपर्यंत दीड वर्षांपासून शोधत होता. मात्र आईचा शोध लागला नाही. मात्र अचानक त्याला एका वाहतूक पोलिसाचा फोन आला. त्याने दाखवलेला फोटो आपल्या आईचाच असल्याची खात्री झाली. त्याने थेट तळवडे गाठले अन् तिथेच मायलेकाची भेट झाली. दोघांनी एकमेकांना मिठी मारली अन् त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. हे दृश्य बघून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
गौतम आकाराम वानखडे हे आळंदीमध्ये मोलमजुरीचे काम करतात. त्यांची ८० वर्षीय आई दीड वर्षांपूर्वी मुलाकडे देवाची आळंदी येथे आली होती आणि तेथूनच बेपत्ता झाली होती. आईचा फोटो नसल्यामुळे गौतम यांनी पोलिसांमध्ये आई हरवल्याबाबतची तक्रार दिली नव्हती. त्यानंतर हरवलेली आई गावी गेली असेल, अशी शक्यता गृहित धरून गौतम यांनी त्यांच्या मूळगावी शेगाव आणि आळंदी, पुणे परिसरामध्ये तीन ते चार महिने आईचा खूप शोध घेतला परंतु ती सापडली नाही. कोणतीही वृद्ध व्यक्ती दिसली की ती आपली आई तर नाही ना, असे वाटत असल्याने तो जवळ जाऊन पाहात असे.
नाकाबंदी आली कामी : शनिवारी (दि. २६) तळवडे वाहतूक विभागाची नेहमीप्रमाणे आयटी पार्क चौक येथे नाकाबंदी सुरू होती. नाकाबंदी दरम्यान कारवाईसाठी थांबवलेल्या एका वाहनचालकाने आयटी पार्क चौकात कॉर्नरच्या एका हातगाडीवर मागील दीड वर्षांपासून राहणाऱ्या एका वृद्ध महिलेला ओळखले. त्यांनी ही बाब पोलीस हवालदार राजू भोसले यांना सांगितली. भोसले यांनी त्या वाहनचालकाकडून वृद्ध महिलेच्या मुलाचा म्हणजे गौतम वानखडे यांचा मोबाइल नंबर घेतला. त्यावर संपर्क साधून सापडलेल्या वृद्ध महिलेबाबत माहिती देऊन त्याचीच आई असल्याची खात्री पटवली.
आईनेही मुलाला ओळखले
आई मिळाल्याची माहिती मिळताच मुलाने थेट तळवडे गाठले. आईला पाहताच त्यांनी आईला मिठी मारली. वृद्ध महिलेनेही आपल्या मुलाला आळखले. त्या दोघांच्याही अश्रूंचा बांध फुटला. हे दृश्य पाहून उपस्थित असलेल्यांचेही डोळे पाणावले. मागील दीड वर्षांपासून वाहतूक पोलीस, तळवडे आयटी पार्क, चाकण एमआयडीसीमध्ये जाणाऱ्या कामगारवर्गाने या वृद्ध महिलेला वेळोवेळी जेवण, कपडे देत वेळोवेळी औषधोपचारही केले. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तळवडे वाहतूक विभागाचे साहाय्यक निरीक्षक मधुकर थोरात, पोलीस हवालदार राजू भोसले यांच्या समयसूचकतेमुळे दीड वर्षांपूर्वी हरवलेल्या वृद्ध महिलेचा शोध लागला.