संग्रहित छायाचित्र
निवडणुकीच्या गदारोळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कामठे आणि त्यांच्या आणखी एका साथीदारावर त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला मारहाण करून धमकावल्याचा आरोप आहे.
तुषार जयसिंग गाडे (वय ३२, रा. करवीर हौसिंग सोसायटी, जी ब्लॉक, एमआयडीसी, शाहुनगर, चिंचवड, पुणे) या तरुणाने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार गजानन कामठे (वय ४०, रा. पिंपळे निलख, पुणे) आणि त्यांचे सहकारी किरण जोगदंड (वय ३४, रा. विठ्ठल नगर, लांडेवाडी) यांच्याविरुद्ध भादंवि कलम ११५ (२) कलम ३५२, २५१ (४) अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि दोन्ही आरोपी एकाच राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. फिर्यादी गाडे यांनी कामठे यांच्या विरोधात व्हॉट्सॲप ग्रुपवर पोस्ट टाकली होती, त्यामुळे जोगदंड यांनी शिवीगाळ केली. यानंतर गाडे हा पुन्हा व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील होताना जोगदंड यांनी मागील वेळेसारखे कोणतेही वेडेचाळे करू नये, अशी सूचना केली होती. त्यावर फिर्यादी म्हणाले, तुषार आणि मी मित्र आहोत, आपण आपसात समजूत काढू. याचा राग आल्याने जोगदंडने त्याला चापट मारली. कामठे यांनीही त्यांना फोनवर धमकी देत माझ्या कार्यक्रमाला येऊ नकोस अन्यथा बघून घेतो, अशी धमकी दिली दिल्याचे फिर्यादी गाडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
स्व-पक्षच काय विरोधी पक्ष अथवा सामान्य नागरिकांना देखील आम्ही कधीच दमबाजी केली नाही. हे आमच्या रक्तात नाही. निवडणुकीच्या तोंडावर खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले जात आहे. विरोधकांची ही परंपरा आहे. मतदार सुज्ञ आहे.
- तुषार कामठे
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.