संग्रहित छायाचित्र
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या टिटवाळा इथल्या रुक्मीणी प्लाझा या प्रसूतिगृहात एका महिलेची प्रसूती झाली. प्रसूतीनंतर तिची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे पुढील उपचारासाठी तिला मुंबईला हलवणे गरजेचे होते. त्यासाठी रुग्णवाहिका हवी होती, पण त्या महिलेला रुग्णवाहिका वेळेत भेटली नाही.
तब्बल पाच तास तिला रुग्णवाहिकेची वाट पाहावी लागली. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महापालिकेच्या टिटवाळा येथील प्रसूतिगृहात प्रसूतीसाठी वैदेही मुंडे या दाखल झाल्या होत्या. त्यांची तिथे प्रसूती झाली. त्यांनी एका बाळाला जन्म दिला. मात्र त्यांच्या बाळाची प्रकृती ठिक नसल्याने बाळाला उपचारासाठी महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात हलवण्यात आले, तर वैदेही यांचीही तब्बेत बिघडली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलवणे गरजेचे होते. त्यासाठी रुग्णाहिका नव्हती. ती मागवण्यात आली.
रुग्णवाहिकेची वाट मुंडे कुटुंब पाहात होते. एक तास, दोन तास असे तब्बल पाच तास वाट पाहिल्यावर त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध झाली. डॉक्टरांनी प्रसूती वेळी चूक केल्याचा आरोप आता नातेवाईकांनी केला आहे. अशा वेळी जर महिलेच्या जिवाचे काही झाले असते तर त्याला कोण जबाबदार असते, असा प्रश्नही नातेवाईकांनी केला आहे.
दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते रुग्णालयात धडकले होते. त्यांनी रुग्णसेवेच्या गलथानपणाचा निषेध केला. शिवाय ही यंत्रणा सुधारली नाही तर मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही दिला. शिंदे गटानंतर ठाकरे गटानेही या घटनेचा निषेध केला आहे.
या प्रकरणी आता कल्याण डोंबिवली महापालिकेनेही आपली बाजू मांडली आहे. महापालिकेकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यास विलंब झाल्याचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी सांगितले. मात्र संबंधित महिलेला मुंबईतील रुग्णालयात पाठवल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर अन्य एका महिलेची प्रसूती देखील करण्यात आली आहे. महापालिकेकडे सध्या १४ रुग्णवाहिका आहेत. त्यापैकी एक रुग्णवाहिका नादुरुस्त आहे. आणखी ९ रुग्णवाहिका खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. लवकर या रुग्णवाहिका सेवेत दाखल होतील. त्यामुळे रुग्णवाहिकांची एकूण संख्या २३ वर जाईल, असे सांगत त्यांनी या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.