संग्रहित छायाचित्र
पंकज खोले
पुणे: महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकरला (Bhimashankar) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ७ ते १० मार्चदरम्यान ७५ बस सोडण्याचे नियोजन केले आहे. पिंपरी-चिंचवड, शिवाजीनगर आणि राजगुरुनगर डेपोतून या बस सोडण्यात येतील. यंदा सुट्ट्यांचा हंगाम आणि देवदर्शनाला निमित्ताने ज्यादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे.
यंदा एसटी महामंडळाकडून सात मार्चपासून भीमाशंकरसाठी ज्यादा बस सोडण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. गर्दी लक्षात घेत, या मार्गावर आणखी बस सोडण्याचा विचार प्रशासनाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, प्रवाशांना सोयी-सुविधा पुरवणार असून, तिकीटाचे आरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाजीनगर आगार येथून भीमाशंकरसाठी १५ बस सोडल्या जाणार आहेत. तर, स्वारगेट येथून दोन, नारायणगाव १६, राजगुरूनगर १९, पिंपरी-चिंचवड येथून ५, बारामती, इंदापूर, सासवड येथून प्रत्येक दोन, भोर व दौंड येथून प्रत्येकी तीन बस सोडण्याचे नियोजन आहे. आवश्यकतेनुसार आणखी बस सोडण्यात येतील, अशी माहिती पुणे जिल्हा वाहतूक अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. (Pune Bhimashankar ST Bus News)
देवदर्शनाला ४२ बसचे नियोजन
भीमाशंकर बसस्थानकापासून भाविकांना मंदिरापर्यंत एसटीकडून शटल सेवा पुरवण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी परिवहन महामंडळाने केले आहे. जिल्ह्यात आणि परिसरात शंकराची विविध देवस्थाने आहेत. महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिंगणापूर, निळकंठेश्वर, रामलिंग, कुकडेश्वर, सोमेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक जात असतात. त्यामुळे एसटीच्या पुणे विभागाने या देवस्थानांना जाणाऱ्या भाविकांसाठी ४२ बस सोडण्याचे नियोजन केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.