संग्रहित छायाचित्र
पिंपरी चिंचवड: महापालिकेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा नामोल्लेख करताना वारंवार अक्षम्य चूक केली जाते. महापुरुषांचा अशाप्रकारे अनादर केल्याप्रकरणी संबधितांविरुध्द कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी केली आहे.
या संदर्भात कोल्हटकर यांनी आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी म्हटले आहे की, भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे कार्य व योगदान केवळ भारत देशासाठी नव्हे, तर जगातील अनेक राष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती माध्यमांना देताना महापालिकेकडून अक्षम्य चूक केल्याचे निदर्शनास आले. संबंधितांनी त्यांना राष्ट्रपिता असा नामोल्लेख केलेला नाही. महापुरुषांचा आदर व सन्मान राखण्याची बाब अधिकारी कर्मचाऱ्यांना ठाऊक नाही का किंवा त्यांनी जाणीवपूर्वक हे केले का, हा प्रश्न उपस्थित होते. ही चूक भावना दुखावणारी असून ती दुर्लक्षित करून चालणार नाही. संबधितांवर कारवाई करून योग्य समज द्यावी, अन्यथा सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले जाईल, असे कोल्हटकर यांनी म्हटले आहे.