इंद्रायणी नदीपात्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई
इंद्रायणी नदीपात्रात (Indrayani River) चिखली रिव्हर रेसिडेन्सी सोसायटीच्या पाठीमागील बाजूला अनधिकृतपणे बांधकामे सुरू आहेत. त्या बांधकामांवर महापालिकेच्या 'क' क्षेत्रीय कार्यालयाने कारवाई केली आहे. चिखलीतील सुमारे ३६०० चौरस फूट आरसीसी बांधकामे निष्कासनाची कारवाई करण्यात आली. महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली. (Illegal Construction in Indrayani River)
महापालिकेच्या (PCMC) क क्षेत्रीय कार्यक्षेत्रांतर्गत चिखली रिव्हर रेसिडन्सी मागील इंद्रायणी नदीपात्रात सध्यस्थितीत चालू असलेल्या अनधिकृत विनापरवाना बांधकामांवर शनिवारी (१६ मार्च) निष्कासनाची कारवाई केली. चिखली परिसरात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. इंद्रायणी नदी पात्रात देखील अतिक्रमण वाढले असून नदीच्या पात्रात अनधिकृत प्लाॅटिंग देखील सुरू आहे. विनापरवाना सुरू असलेल्या अनधिकृत सुमारे ३६०० चौरस फूट आरसीसी बांधकामावर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली. 'क' क्षेत्रीय कार्यालयाचे पथकामार्फत उपायुक्त अण्णा बोदडे तसेच उपअभियंता सूर्यकांत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ अभियंता किरण सगर, रचना दळवी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहायक निकिता फडतरे, स्मिता गव्हाणे यांच्यासह कारवाईत 'क' क्षेत्रीय कार्यालयाकडील अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस पथक सहभागी झाले होते.
शहराच्या विविध भागात दररोज अतिक्रमण कारवाई केली जात आहे. नागरिकांनी रस्त्यांवर बेवारस वाहने उभी करू नये, तसेच अनधिकृत टप-या, पत्राशेड व बॅनर्स उभारू नये. तसेच फूटपाथ स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, आयुक्त यांच्या निर्देशनानुसार सदर कारवाई केलेल्या ठिकाणी मनपा परवानगी घेतल्याशिवाय अनधिकृत पत्राशेड / बांधकाम करू नये, नदीपात्र व इतर परिसरात नागरिकांनी अनधिकृत विनापरवाना बांधकाम करू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.