Action Against Hotels : बांगलादेशी प्रेक्षकांपायी 'त्या' हॉटेलवर कारवाई

विश्वचषक क्रिकेट (World Cup Cricket) स्पर्धेतील भारत-बांगलादेश सामना (India-Bangladesh Match)पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवडला (Pimpri-Chinchwad) आलेल्या पाच बांगलादेशी प्रेक्षकांची माहिती पोलिसांना न दिल्यामुळे दोन हाॅटेलवर कारवाई (Action against hotels) करण्यात आली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sat, 21 Oct 2023
  • 02:55 pm
Action Against Hotels

बांगलादेशी प्रेक्षकांपायी 'त्या' हॉटेलवर कारवाई

भारत-बांगलादेश विश्वचषक सामन्यासाठी पिंपरी-चिंचवडला आलेल्या पाच बांगलादेशी प्रेक्षकांच्या निवासाची माहिती न देणाऱ्या दोन हॉटेलवर पोलिसांची कारवाई

रोहित आठवले
विश्वचषक क्रिकेट (World Cup Cricket) स्पर्धेतील भारत-बांगलादेश सामना (India-Bangladesh Match)पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवडला (Pimpri-Chinchwad) आलेल्या पाच बांगलादेशी प्रेक्षकांची माहिती पोलिसांना न दिल्यामुळे दोन हाॅटेलवर कारवाई (Action against hotels) करण्यात आली.

 हिंजवडीच्या लक्ष्मी चौकात असलेले हॉटेल कम्फर्ट एक्झिक्युटिव्ह तसेच  शिरगांव येथील साई सत्यम लॉजच्या मालकांवर ही कारवाई करण्यात आली. हिंजवडी आणि तळेगाव दाभाडे पोलिसांनी ही कारवाई केली. भारत विरुद्ध बांगलादेश दरम्यान गहुंजे येथे गुरुवारी (दि. १९) झालेल्या क्रिकेट सामन्यासाठी १० ते १५ बांगलादेशी प्रेक्षक आल्याची नोंद आहे. यापैकी पाच जणांचे वास्तव्य हे पिंपरी-चिंचवडमध्ये होते. अन्य सुमारे १० प्रेक्षक हे पुण्यातील शिवाजीनगर भागात वास्तव्याला होते, अशी नोंद आहे.

हजारो प्रेक्षकांमध्ये केवळ १० ते १५ जण बांगलादेशातून आले असे नाही, तर बांगलादेशातून आलेल्यांपैकी केवळ १० ते १५ जण हे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्याला होते, तर अन्य प्रेक्षक हे पुण्याच्या नजीक असलेल्या शहरांमध्ये राहून गेल्याच्या नोंदी आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर गेल्या काही महिन्यांमध्ये राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि मिलिटरी इंटेलिजन्सने (एमआय) कारवाई केली आहे. मोशी येथील एका बांधकाम साईटवर मजूर म्हणून राहणाऱ्यांना एटीएसने नुकतीच अटक केली होती. तर हडपसर भागात एमआयने पुणे पोलिसांच्या मदतीने केलेल्या कारवाईत अनेकांना अटक केली. त्याचबरोबर पुण्यातील बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय केल्याप्रकरणीदेखील काही बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. 

एकंदरीत पुण्यात बांगलादेशींचे बेकायदेशीर वास्तव्य आणि क्रिकेट मॅचच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशी प्रेक्षक येण्याची शक्यता लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील विविध हॉटेल-लॉजची तपासणी केली. तेव्हा हिंजवडीच्या लक्ष्मी चौकात असलेल्या हॉटेल कम्फर्ट एक्झिक्युटिव्ह येथे १५ तारखेपासून दोन तर १७ तारखेपासून दोन बांगलादेशी नागरिक वास्तव्याला असल्याचे उघड झाले. त्याचबरोबर शिरगांव येथील साई सत्यम लॉजमध्ये एक बांगलादेशी नागरिक राहात असल्याचे उघड झाले.

तसेच अन्य एका हॉटेलमध्येदेखील एक बांगलादेशी प्रेक्षक वास्तव्याला होता. परंतु, संबंधित हॉटेलने याबाबतची माहिती पोलिसांना वेळेत दिली होती. हिंजवडी आयटीपार्क बरोबरीनेच शहरातील बहुराष्ट्रीय कंपन्या आणि एकंदरीत अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून विविध पातळ्यांवर तपास आणि गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने संयुक्त मोहीम राबविली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारत-बांगलादेश विश्वचषक सामन्यापूर्वी शहरात विशेष मोहीम राबवत कारवाई करण्यात आली आहे.

उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड बरोबरीनेच आयटीपार्क, शिक्षण आदींमुळे विविध देशातील नागरिकांचे नेहमी शहरात येणे-जाणे सुरू असते. त्यामुळे या परदेशी नागरिकांच्या आणि प्रामुख्याने शहरवासियांच्या सुरक्षेसाठी देशातील सर्वच तपास आणि गुप्तचर यंत्रणांनी पिंपरी-चिंचवडवर लक्ष केंद्रित केले आहे. वेळोवेळी संयुक्त बैठकांमधून याबाबत आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.

कोणताही परदेशी नागरिक हॉटेलमध्ये वास्तव्याला आल्यास त्याची माहिती ऑनलाईन पद्धतीने २४ तासांच्या आत पोलिसांना कळविणे बंधनकारक आहे. शहरात व्यवसाय, शिक्षण, पर्यटन आदींसह विविध कारणांसाठी परदेशी नागरिक येत असतात. त्यामुळे सर्व हॉटेल तसेच लॉज चालक-मालकांना अशी माहिती २४ तासांच्या आत देण्याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. त्यानंतरही माहिती न देणाऱ्या दोन हॉटेल चालक-मालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

– सतीश माने, सहायक पोलीस आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी, पिंपरी-चिंचवड

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest