रोहित आठवले
भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी (२० सप्टेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन येथे हा अपघात झाला.
छत्राराम रामजी चौधरी (वय ४५, रा. रावेत), आछलाराम दर्गाजी चौधरी (वय ५०, रा. चिंचवडगाव) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. ट्रकचालक रामेश्वर तुळशीराम जाधव (वय २३, रा. शिंदेगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक, मूळगाव कारली, जि. वाशिम) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी संदीप शेळके यांनी गुरुवारी (२१ सप्टेंबर) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. याबाबत माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली.
तसेच, काही वेळाने अपघातग्रस्त वाहने पोलीस ठाण्यात आणून लावली. दरम्यान, गुरुवारी (२१ सप्टेंबर) सकाळी ठाण्यात आलेल्या नातेवाईकांनी मृतांच्या गाडीच्या डिक्कीत दहा लाखांची रोकड असल्याचे सांगितले. पोलिसांनी देखील लगबगीने गाडीची डिकी उघडून पाहिली. त्यावेळी त्यांना रोकड मिळून आली. त्यानंतर पोलिसांनी रोकड संबंधित नातेवाईकांच्या स्वाधीन केली. मात्र, दोघांचे जीव गेल्यावर या १० लाखांचे करायचे काय, असा सवाल उपस्थित करताना नातेवाईकांना अश्रू अनावर होत होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.