बोपोडी मेट्रो स्टेशनपासून ५० फूट अंतरावर स्क्रॅप गोडाऊन, प्रवाशांसह नागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
विकास शिंदे
बोपोडी मेट्रो स्टेशनपासून (Bopodi Metro Station) अवघ्या ५० फूट अंतरावर नागरी वस्तीत अनधिकृतपणे भंगार साहित्याचे गोडाऊन (Scrap Godown) करण्यात आले आहे. त्या भंगार साहित्यामधील वायरिंगला सोमवारी (१८ मार्च) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन वाहनांकडून ती आग आटोक्यात आणली. मात्र, शेजारीच असणाऱ्या केमिकल्सयुक्त भंगार साहित्याला आग लागली असती तर मोठ्या जीवित आणि वित्तीय हानीला सामोरे जावे लागले असते. त्यामुळे अनधिकृतपणे भंगार साहित्याच्या गोडाऊनवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सकाळी ११ ते दुपारी ५ वाजेपर्यंत उन्हाचे चटके लागू लागले आहेत. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेने आगीच्या घटना वारंवार घडत असतात, पण नागरी वस्तीत आणि मेट्रो स्टेशनजवळ भंगार व्यवसायाचे अनधिकृत दुकान थाटण्यात आले आहे. बोपोडी मेट्रो स्टेशनजवळ ५० फूट अंतरावर भंगार साहित्याचे गोडाऊन करण्यात आले आहे. या भंगार साहित्यात रबर, प्लास्टिक, इतर केमिकलयुक्त साहित्य, गॅस सिलेंडर, तेलाचे बॅरेल, अग्निरोधक सिलेंडर, टायर, ट्यूब, स्क्रॅप वाहने, रिकामे पेट्रोल टॅंक यासह पेट्रो केमिकल्सचे भंगार साहित्य एकत्रित साठा करण्यात आलेला आहे.
या भंगार साहित्यामुळे नागरी वस्तीसह मेट्रो स्टेशनलादेखील धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या भंगार दुकानामुळे नागरी वस्तीत मृत्यूचा साठा असून कधी, काय होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे स्थानिक रहिवासी नागरिकांना आपला जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.
दरम्यान, बोपोडी मेट्रो स्टेशनजवळ आणि नागरी वस्तीत केमिकलयुक्त साहित्य ठेवून भंगाराचे गोडाऊन करण्यात आले आहे. पण, त्या भंगार व्यावसायिकाला महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाने आणि महापालिका पर्यावरण विभागाकडून परवानगी दिलीच कशी, असा सवाल देखील स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
धूर आणि दुर्गंधीयुक्त वायू पसरून नागरिकांना त्रास
भंगार गोदामाला लागणाऱ्या आगीमुळे प्रदूषणात भर पडत आहे. त्यामुळे वायुप्रदूषण होत असून परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण देखील होत आहे. त्यात बोपोडी मेट्रो स्टेशनपासून ५० फूट अंतरावर भंगार साहित्य ठेवून स्क्रॅपचा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. या ठिकाणी नागरी वस्तीदेखील मोठ्या प्रमाणात आहे. या गोडाऊनमध्ये भंगार, जुन्या वस्तू, प्लास्टिक वस्तू गोळा करत मोठा साठा तयार केला आहे. तसेच काही प्रमाणात वायरिंग जाळून त्यातील तांब्याच्या तारा काढण्याचा प्रकार देखील दररोज केला जात आहे. त्यामुळे सदरच्या गोडाऊनला कधीही आग लागून वित्तीय आणि जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. त्यात भंगार साहित्य जाळल्याने त्यात धूर आणि दुर्गंधीयुक्त वायू पसरून तेथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
बोपोडी मेट्रो स्टेशनपासून ५० फूट अंतरावर भंगार साहित्याचे गोडाऊन करण्यात आले आहे. या गोडाऊनमधील वायरिंगला सोमवारी (१८ मार्च) आग लागली होती. वेळीच ही आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पण, या गोडाऊनमधील भंगार साहित्य पाहता कधीही काहीही होऊ शकते. चुकून जरी त्या गोडाऊनला आग लागली तर जीवितहानी आणि वित्तीय हानी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. कारण, त्या जागेवर रबर, प्लाॅस्टिक, बॅरेल, केमिकलयुक्त साहित्य, स्क्रॅपचा प्रचंड साठा करण्यात आला आहे. हे सर्व साहित्य ज्वलनशिल असून प्लॅस्टिक वस्तू, रबर, बॅरेल, केमियुक्त साठा, अल्युमिनियम, केबल, रद्दी या परिसरात उघड्यावर ठेवण्यात आल्या आहेत.
- प्रशांत राऊळ , पर्यावरणप्रेमी नागरिक
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.