संग्रहित छायाचित्र
पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणअंतर्गत मनुष्यबळ मिळवण्यासाठी कंत्राटी कंपनी नेमण्यात आली आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने तसेच, विभागाला मागणीनुसार मनुष्यबळ पुरवण्यात येत आहे. सद्यस्थितीत केवळ १८५ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. मात्र, कामाचा ताण वाढत असल्याने आणि प्राधिकरणातील विविध विभागांमध्ये मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाल्याने आणखी ८० पदे कंत्राटी स्वरूपात भरली जाणार आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात अतिक्रमण निर्मूलन विभागामध्ये चाळणी पद्धतीने कर्मचारी नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पीएमआरडीए येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी नव्याने बीव्हीजी या कंपनीला मनुष्यबळाचा ठेका देण्यात आला आहे. उपलब्ध मनुष्यबळावर प्रशासकीय कामाचा ताण पडत असून बाह्यस्त्रोतामार्फत कंत्राटी पध्दतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. खासगी संस्थांमार्फत कंत्राटी कर्मचारी भरती केली जात आहे. संबंधित एजन्सीच्या माध्यमातून पीएमआरडीएच्या प्रशासकीय सेवेत अभियंतासह चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहेत.
मनुष्यबळ अपुरे पडत असल्यामुळे त्यांचे काम वेळेत होत नाही. त्यामुळे नागरिकांची नाराजी ओढवून घेण्याची वेळ पीएमआरडीए प्रशासनावर आलेली आहे. नागरिकांची प्रशासकीय कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी पीएमआरडीएने कंत्राटी कर्मचारी भरती प्रक्रिया हाती घेतली आहे. दरम्यान, यापूर्वी असलेल्या कंपनीचे जवळपास पावणेतीनशे कर्मचारी होते. मात्र, कंपनी बदलल्यानंतर नव्याने सर्व प्रक्रिया करण्यात आली. त्यामध्ये काही कर्मचाऱ्यांच्या सेवा संपुष्टात केल्या. मात्र, पुन्हा नव्याने कर्मचारी भरताना केवळ साठ टक्केच कर्मचारी घेतले होते. म्हणजेच १८५ कर्मचारी कंत्राटी स्वरूपात घेतले. मात्र, कामाचा ताण वाढल्याने आणखी काही पदे भरण्यात येणार आहेत. त्यानुसार आणखीन ८० पदांची भरती केली जाणार आहे.
विविध विभागांकडून रिक्त पदे व आवश्यक पदांची माहिती मागवण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने संबंधित कंपनीला ती माहिती देण्यात येत आहे. त्यानंतर उमेदवारांना बोलावून चाचणी घेण्यात आल्यानंतर कंत्राटी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. आणखी ८० पदाची भरती होईल.
- सुनील पांढरे, सह आयुक्त, प्रशासन, पीएमआरडीए.
-
अभियंतापदाची मोठी मागणी
प्राधिकरण अंतर्गत अभियांत्रिकी, अतिक्रमण व निर्मूलन, प्रकल्प या विविध विभागांमध्ये अभियंता पदाची कमतरता आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये अभियंता पदाची भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी उमेदवार चाचणी देण्यासाठी कार्यालयात आले होते. त्याचप्रमाणे आणखी काही पदेदेखील भरण्यात येणार आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.