संग्रहित छायाचित्र
पिंपरी चिंचवडमधील कुंडमळा येथे फिरायला गेलेले चार तरुण पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जणांना वाचवण्यात यश आले आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.
मृतांपैकी अंकित वर्मा या तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मात्र, अशोक गुलाब चव्हाण (वय १७, रा. चिंचवड) हा अद्याप बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी कुंडमळा येथे जाधववाडीमधील चार मित्र फिरायला आले होते. ते कुंडमळा येथे इंद्रायणी नदीच्या पाण्यात उतरले. मात्र, या दरम्यान ते चौघेही पाण्यात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा संस्थेचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघांना वाचवले. मात्र, दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यातील अंकित वर्मा या तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे.
मात्र, अशोक अद्यापही बेपत्ता आहे. गुरुवारी त्याचा मृतदेह शोधण्यात आला. मात्र, मिळून न आल्यामुळे शोध मोहिम थांबविण्यात आली होती. आज (शुक्रवारी) पुन्हा एकदा शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.