पिंपळे निलख परिसरात वाढले कचऱ्याचे ढीग
स्वच्छ अन् सुंदर म्हणून गवगवा होत असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरात जागोजागी कच-याचे ढिगारे साठले आहेत. ऐन दिवाळीत साचणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पिंपळे निलख येथील विशालनगरच्या अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दैनंदिन कचरा न उचलल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढला असून अस्वच्छतेमुळे विविध आजारांचे प्रमाण देखील वाढले आहे. पिंपळे निलख येथील विशाल नगरसह परिसरात जागोजागी अडगळीच्या रस्त्यावर कच-याचे ढीग साचलेले आहेत. याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष केले आहे. कचराकुंडी नसतानादेखील परिसरात ही समस्या नित्याचीच बनली आहे. भर रस्त्यात साचणारा हा कचरा मोकाट जनावरांकडून व कचरा वेचणा-यांकडून तुडविला जातो. त्यामुळे रस्त्यात कचरा पसरून या समस्येत भरच पडत आहे.
घरोघरचा कचरा गोळा करून तो कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्याचे काम महापालिकेने ए. जी. इनव्हायरो इन्फ्रा आणि भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) या दोन संस्थांना देण्यात आले, त्यासाठी महापालिका वार्षिक ५६ कोटी रुपये खर्च करत आहे. पालिकेने मे.. भारत विकास ग्रुप इंडिया २१ कोटी ५६ लाख आणि ए. जी.एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्टस २२ कोटी १२ लाख रुपयांचे दोघांना काम दिले आहे. हे काम आठ वर्षांच्या कालावधीसाठी दिले गेले असून ठेकेदाराला दरवर्षी निश्चित स्वरूपात दरवाढही दिली जात आहे.
ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत महापालिकेचा घरोघरचा कचरा संकलन ए.जी. एनव्हायरो इन्फ्रा यांना दिलेले आहे. त्यांच्याकडून दिवसभरात सुमारे चारशे ते पाचशे टन कचरा गोळा केला जातो. घराघरातून आणि सर्व व्यावसायिक आस्थापनातून कचरा जमा करणे, तसेच शहरातील मोशी कचरा डेपो या ठिकाणी टाकण्याचे काम दिलेले आहे. मात्र शहरात अनेक ठिकाणी दैनंदिन कचरा उचलण्यास ठेकेदारांचे कर्मचारी कामचुकारपणा करत आहेत. त्यामुळे कच-याचे ढीग साचत आहेत, तर कचरा उचलल्यानंतर जंतुनाशक औषधे आणि पावडरची फवारणी करीत नाही. दरम्यान, ठेकेदारांचे कर्मचारी सर्व ठिकाणचा कचरा नियमित उचलतात की नाही, यासाठी ठेकेदाराकडून पाहणी केली जात नाही. मनपाच्या आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक देखील ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याची माहिती वरिष्ठांना कळवीत नसल्याने हा कचरा त्याच ठिकाणी साठून राहतो. कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
स्वच्छतेचे तीनतेरा
शहरातील नागरिकांकडून कचरा जमा करण्यासाठी महापालिकेने ठेकेदारास घंटागाड्या दिल्या आहेत. त्या गाडीवरील घंटा अथवा स्पिकरवरील गाणे वाजल्यावर परिसरातील नागरिक आपल्या घरातील कचरा आणून ते घंटागाडीत टाकत होते. परंतु गेल्या वर्षभरापासून गाड्यावर लावलेली घंटा वाजत नाही, की स्पीकर वाजत नाही. त्यामुळे नागरिकांना घंटागाडीची वेळ समजत नाही. शहरात बंद झालेल्या कचराकुंड्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. रस्त्यालगत घाण साचून स्वच्छता अभियानाचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे घंटागाडीवरील भोंगे अथवा घंटा वाजविण्याची मागणी वाढू लागली आहे.