संग्रहित छायाचित्र
पावसाळ्यात पुराचे पाणी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागातील लोकवस्तीमध्ये शिरले होते. याचा फटका जवळपास ९ हजार कुटुंबांना बसला होता. पूर ओसरल्यानंतरदेखील पंचनामे सुरू होते. त्यानंतर पूरग्रस्तांच्या खात्यावर दहा हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. मात्र, चार महिने उलटूनही जवळपास २०० कुटुंबीयांना मदत मिळाली नाही. गेल्या महिनाभरापूर्वी आंदोलन करूनही जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नाही. परिणामी, मदत मिळण्यासाठी पूरग्रस्त कुटुंबीय हेलपाटे मारत आहेत. बँकेतील तांत्रिकदृष्ट्या तपासणी सुरू असल्याचे पिंपरी-चिंचवड तहसील विभागाकडून सांगण्यात आले.
जुलै महिन्यातील शेवटच्या आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवड शहराला पावसाचा तडाखा बसला होता. शहरातील मुळा, पवना या नद्यांना पूर आला होता. हजारो घरांमध्ये पुराचे आणि पावसाचे पाणी शिरून नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना मदतची मागणी केली जाऊ लागली. पूर ओसरल्यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग आली. तहसील विभागाकडून ७ हजार ५१९ घरांचे पंचनामे करण्यात आले. शासनाकडून पूरग्रस्त कुटुंबाला प्रत्येकी १० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले. मात्र, अद्यापही काही पूरग्रस्तांना अनुदान मिळाले नसल्याचे समोर आले आहे. तलाठी कार्यालयातही अनेक नागरिकांनी आंदोलन केले. मात्र त्याची दखल घेत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पिंपरी परिसरातील आंबेडकर कॉलनी, रमाईनगर, भाटनगर, बौद्धनगर त्याचप्रमाणे दापोडी आणि सांगवी या परिसरातदेखील अनेक नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनदेखील तहसील कार्यालयाकडून कोणतीही माहिती मिळत असल्याचा आरोप या नागरिकांनी केला आहे. पिंपरी तलाठी कार्यालयासमोर गेल्या महिन्यामध्ये या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर आश्वासन देऊनही त्याचे पालन केले नाही. दरम्यान, पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालय यांनी दिलेल्या माहितीनुसार खातेदारांच्या खात्यामध्ये पैसे परत येत आहेत. नेमकी कोणती तांत्रिक समस्या आहे याची तपासणी करण्यात येणार आहे. संबंधित पूरग्रस्तांचे खाते अपडेट नसल्याने ट्रांजेक्शन पूर्ण होत नाही. त्यामुळे संबंधितांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांना बँकेच्या खात्यांची कागदांची पूर्तता करण्यास कळवले आहे.
पूरग्रस्तांच्या खात्यावरती पैसे पाठवले आहेत. तांत्रिक बाबींमुळे अद्याप काहींना पैसे मिळाले नाहीत. त्या सर्वांची यादी मागवली असून, तांत्रिक बाबी तपासण्यात येत आहेत. लवकरच त्यावर तोडगा काढून संबंधितांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात येतील. - मनीषा माने, नायब तहसीलदार, पिंपरी-चिंचवड
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.