संग्रहित छायाचित्र
न्यूयॉर्क : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्याचा सर्वाधिक फायदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांना झाला आहे. मस्क यांच्याकडे डॉलरचा पूर आला आहे. मस्क यांच्या संपत्तीत अवघ्या ८ दिवसांत ७३ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ही वाढ डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकूण संपत्तीच्या १२ पट आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांच्याकडे ८ दिवसांपूर्वी २६२ अब्ज डॉलरची संपत्ती होती. ती आता ३३५ अब्ज डॉलर (२५,३२,३३१.५४ कोटी रुपये) वर पोहोचली आहे. ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्समध्ये डोनाल्ड ट्रम्प ४८८ व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ६.४ अब्ज डॉलर आहे. एलॉन मस्क यांच्या संपत्तीत सोमवारी (११ नोव्हेंबर) २०.८ अब्ज डॉलरची वाढ झाली.
या आधी रविवारी (१० नोव्हेंबर) त्यांच्या संपत्तीत २६.५ अब्ज डॉलरची वाढ झाली होती. विजयानंतर ट्रम्प यांनी एलॉन मस्क यांचे तोंड भरून कौतुक केले होते. आपल्याकडे एक नवा रॉकस्टार असल्याचे ट्रम्प म्हणाले. मस्क यांनी माझ्यासोबत दोन आठवडे प्रचार केला. यावेळी मी अंतराळात पाठवलेल्या त्यांच्या रॉकेटबद्दल माहिती घेतली. ते रॉकेट खूप जबरदस्त आहे.
मी मस्क यांच्यावर खूप प्रेम करतो, ती एक अद्भुत व्यक्ती आहे, असे ट्रम्प म्हणाले होते. एलॉन मस्क यांची यंदाची कमाई अदानी किंवा अंबानी यांच्या आयुष्यभराच्या कमाईपेक्षा जास्त आहे. इलॉन मस्क हे जगातील नंबर वन श्रीमंत तर आहेतच, पण यंदाच्या कमाईतही ते नंबर वन आहेत.
मस्क यांच्या संपत्तीत या वर्षी आतापर्यंत १०५ अब्ज डॉलरची वाढ झाली असून अदानी यांच्या ९०.७ अब्ज डॉलर आणि मुकेश अंबानी यांच्या ९६.२ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत ही संपत्ती खूपच जास्त आहे. यंदाच्या कमाईत एनव्हिडियाचे मालक जेन्सन हुआंग दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या वर्षी त्यांची कमाई ८२.८ अब्ज डॉलर आहे. जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत हुआंग हे १२७ अब्ज डॉलरसह ११ व्या स्थानावर आहेत.
लॅरी एलिसन यांनीही या वर्षी आपल्या संपत्तीत ८०.७ अब्ज डॉलरची भर घातली आहे. यामुळे ते ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्समध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती २०४ अब्ज डॉलर आहे. त्या खालोखाल मार्क झुकेरबर्ग या वर्षी ७८.४ अब्ज डॉलर्सची कमाई आणि २०६ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. अब्जाधीशांच्या यादीत ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.