संग्रहित छायाचित्र
वॉशिंग्टन: २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे अमेरिकेतील लाखो जण दुखवले आहेत. यात महिलांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे महिलांनी ट्रम्प यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला फोर 'बी' चळवळ असे नाव देण्यात आले आहे. मोठ्या संख्येने अमेरिकन महिला या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. या चळवळीअंतर्गत महिलांनी सेक्स, नातेसंबंध, लग्न आणि मुले जन्माला घालण्यास नकार दिला आहे. ही चळवळ सुरुवातीला दक्षिण कोरियातून सुरू झाली होती आणि आता ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेत ही चळवळ झपाट्याने वाढू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या चळवळीअंतर्गत अनेक महिलांनी सेक्स स्ट्राइकवर (शरीरसंबंधांचा संप) जाण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या विजयामुळे महिलांचे संरक्षण व गर्भपातविषयक हक्कांवर काही परिणाम होण्याच्या शक्यतेच्या भीतीने महिलांनी या आंदोलनाची घोषणा केली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या प्रचारात ट्रम्प यांना स्त्रीवादविरोधी म्हणून संबोधण्यात आले होते, ज्यामुळे अनेक महिलांना ट्रम्प यांच्या पराभवाची आशा होती. मात्र, अनेक अमेरिकन महिलांनी सोशल मीडियावर ट्रम्प यांच्या विजयाबद्दल निराशा आणि रागाच्या भावनेतून फोर बी चळवळीत सामील झाल्याची घोषणा केली आहे. नकारात्मकतेचे प्रतीक म्हणून वापरल्या जाणाऱ्या कोरियन शब्द 'बी' वरून या चळवळीचे नाव पडले आहे.
चळवळीचा जन्म दक्षिण कोरियात
दक्षिण कोरियात #MeToo आणि 'एस्केप द कॉर्सेट' सारख्या चळवळीनंतर ही चळवळ उदयास आली, ज्यामुळे तेथील समाजात लक्षणीय बदल झाले. दक्षिण कोरियन स्त्रीवादी वर्तुळात आणि २०१० च्या दशकाच्या मध्यापासून ते उत्तरार्धापर्यंत सोशल मीडियावर महिलांवरील हिंसाचाराच्या लाटेदरम्यान आणि दक्षिण कोरियन समाजातील लैंगिक भेदभाव आणि विषमतेच्या इतर अभिव्यक्तींच्या विरोधात ही चळवळ सुरू करण्यात आली होती. फोर बी हे चार शब्दांचे संक्षिप्त रूप आहे जे 'बी' पासून सुरू होते, ज्याचा अर्थ कोरियन भाषेत 'नाही' असा होतो. बीहोन्ग (Birthing) अर्थात मुले न होण्याचा निर्णय, बिहोन (Marriage) म्हणजे
लग्न न करण्याचा निर्णय, बीचोख (Dating) म्हणजे डेटिंग न करण्याचा निर्णय आणि बीसेक्स (Sex) म्हणजेच सेक्स न करण्याचा निर्णय अशा चार गोष्टी यात अंतर्भूत आहेत. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पुढची चार वर्षं सत्तेवर असतील, तोपर्यंत अशी चळवळ राबवण्याचे आवाहन या महिलांनी केले आहे.
दक्षिण कोरियन समाजात पुरुषी हिंसेला स्त्रिया कंटाळल्या आहेत. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार गेल्या नऊ वर्षांत दक्षिण कोरियात किमान ८२४ महिलांची हत्या झाली आहे, तर ६०२ महिलांना त्यांच्या साथीदारांकडून होणाऱ्या हिंसाचारामुळे मृत्यूचा धोका आहे. पण त्यात आर्थिक घटकही आहेत. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटच्या (ओईसीडी) आकडेवारीनुसार, दक्षिण कोरियातील पुरुष महिलांपेक्षा सरासरी ३१.२ टक्के जास्त कमावतात. दक्षिण कोरियन समाज कुटुंबाच्या बाबतीतही बराच पुराणमतवादी आहे. कोपनहेगन विद्यापीठातील मानववंशशास्त्र विभागातील प्राध्यापक अयो वाहलबर्ग यांनी अल जझीराला सांगितले की, मुलांची काळजी घेणे आणि घरातील कामे, तसेच वृद्धांची काळजी घेण्याची जबाबदारी सहसा महिलांवर असते. परंतु, वाढत्या महागाईमुळे महिलांना घराबाहेर काम करण्याशिवाय पर्याय उरला नाही, म्हणजे त्यांच्या जबाबदाऱ्या या वाढल्या आहेत.