संग्रहित छायाचित्र
ढाका: बांगलादेश अंतर्गत यादवीने त्रस्त आहे. त्यामुळे तेथे असलेल्या अल्पसंख्य हिंदू समाजावर सध्या मोठ्या प्रमाणावर हद्देदेखील होत आहेत. यातच आता बांगलादेशातील चितगावमध्ये हेफाजत-ए-इस्लाम या कट्टर इस्लामिक संघटनेने शुक्रवारच्या नमाजानंतर इस्कॉनविरोधात काढलेल्या रॅलीमध्ये इस्कॉनच्या भाविकांना पकडून ठार मारण्याच्या घोषणा दिल्या.
रॅलीत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणीही केली. इस्कॉनवर बंदी घातली नाही तर आंदोलन करू, अशा धमक्या या वेळी देण्यात आल्या. हेफाजत-ए-इस्लामच्या कार्यकर्त्यांनी ५ नोव्हेंबर रोजी हजारी लेन घटनेत सहभागी असलेल्या सर्वांना अटक करून त्यांना शिक्षा करण्याची मागणी केली होती.
बांगलादेशातील चितगावमधील हजारी लेन भागात ५ नोव्हेंबरच्या रात्री लष्कर आणि स्थानिक हिंदू समुदायामध्ये चकमक झाली होती. यात अनेक पोलिस आणि बांगलादेशी हिंदू जखमी झाले. हजारीगली परिसरात सुमारे २५ हजार लोक राहतात, त्यापैकी ९० टक्के हिंदू समुदायाचे आहेत.
त्याचवेळी हजारी लेन घटनेत त्यांचा कोणताही सहभाग नसल्याचा दावा इस्कॉनने केला आहे. राजधानीतील स्वामीबाग इस्कॉन आश्रमात शुक्रवारी सकाळी इस्कॉन बांगलादेशने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भाविकांच्या सुरक्षेचीही मागणी करण्यात आली आहे.
इस्कॉन कोलकाता उपाध्यक्ष राधारमण दास यांनी सोशल मीडियावर लिहिले की, 'आम्ही बांगलादेशातील गंभीर परिस्थितीबद्दल अत्यंत चिंतित आहोत. इस्लामिक कट्टरपंथी उघडपणे भाविकांना पकडून, त्यांच्यावर अत्याचार आणि नंतर ठार मारण्याची धमकी देत आहेत. आम्हाला त्यांच्या सुरक्षेची काळजी आहे. या हिंसक कारवाया रोखण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत, ३ महिन्यांत २५० हून अधिक घटना झाल्या. काही दिवसांपूर्वी चितगाव येथील इस्कॉन संस्थेचे सचिव चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी उर्फ चंदन कुमार धर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.