संग्रहित छायाचित्र
वॉशिंग्टन: राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या मंत्रिमंडळात कोणते सहकारी निवडतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. यापूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेला निष्कारण कुठल्या तरी हिंसाचारात, युद्धात ओढल्याचे आक्षेप घेतले जातात. या पार्श्वभूमीवर ट्रम्प त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये स्थलांतरण, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, अर्थ अशा मुद्यांवर कोणती भूमिका घेतात आणि या जबाबदाऱ्या कोणत्या वृत्ती-प्रवृत्तीच्या व्यक्तींकडे सोपवतात, याकडे विशेष लक्ष लागलेले आहे. ट्रम्प यांनी परराष्ट्र व्यवहाराची जबाबदारी मार्को रूबियो यांच्यावर सोपवली आहे.
मार्को रूबियो हे चीन, इराण आणि क्युबा या देशांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेणारे नेते आहेत. त्याचवेळी मार्को रूबियो हे भारताबद्दल सकारात्मक दृष्टिकोन असणारे नेते आहेत. ट्रम्प यांनी माईक वाॅल्ट्झ यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) म्हणून निवड केली आहे. यामुळे भारताच्या हितासाठी सकारात्मक पाऊल उचलले गेले आहे. माईक वाॅल्ट्झ हे निवृत्त नॅशनल गार्ड अधिकारी असून, अफगाणिस्तानातील युद्धात त्यांनी भाग घेतला होता. माईक वॉल्ट्झ यांच्या चीनविरोधी भूमिकेमुळे ते भारतासाठी महत्त्वाचे मानले जातात. कारण भारत-चीन संबंधांवर याचा प्रभाव पडू शकतो. वॉल्ट्झ हे रिपब्लिकन पक्षाचे खासदार आहेत. त्यांनी अमेरिका-भारत संबंध सुधारण्याच्या उद्दिष्टाने स्थापन केलेल्या “इंडिया कॉकस” संघटनेतही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इंडिया कॉकस ही अमेरिकेतील एक द्विपक्षीय संघटना आहे. ही संघटना भारतीय-अमेरिकन समुदायाशी संबंध दृढ करण्यास मदत करते. यामुळे वॉल्ट्झ हे भारताचे हित जपणारे एक प्रभावी व्यक्तिमत्त्व मानले जातात. यामुळे त्यांची निवड भारतासाठी सकारात्मक ठरू शकते, असे म्हटले जात आहे.
मार्को रूबियो आणि माईक वॉल्ट्झ यांनी अनेक प्रसंगी चीनविरोधी वक्तव्ये केलेली आहेत. त्यांनी चीनमधील कोविड-१९ च्या उत्पत्तीपासून ते उईघुर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांवर कठोर भाष्य केले आहे. त्यांच्याच मागणीवर अमेरिकेने २०२२ हिवाळी ऑलिंपिकवर बहिष्कार टाकण्याचा विचार केला होता. रिपब्लिकन पक्षाच्या 'चायना टास्क फोर्स'मध्ये वॉल्ट्झचा समावेश असल्यामुळे ते आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील आव्हानांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे समर्थक आहेत. या दृष्टिकोनामुळे चीनच्या आक्रमक धोरणांना आव्हान दिले जाऊ शकते. यामुळे भारताला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ होऊ शकतो.याशिवाय, ट्रम्प यांनी इतर महत्त्वपूर्ण पदांसाठीही काही नियुक्त्या केल्या आहेत. स्टीफन मिलर यांना धोरणात्मक प्रकरणांचे उपप्रमुख म्हणून निवडले आहे. तसेच टॉम होमन यांना 'बॉर्डर झार' म्हणून नियुक्त केले आहे. होमन यांच्यावर बेकायदेशीर परदेशी नागरिकांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्याची जबाबदारी असणार आहे. ही जबाबदारी ट्रम्प यांच्या अजेंड्याचा महत्त्वाचा भाग असल्याचे म्हटले जात आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.