संग्रहित छायाचित्र
तेल अविव : हमासच्या या हल्ल्यात मारल्या गेलेल्यांच्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी दि. २७ आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ‘नेतन्याहू शेम ऑन यू’च्या घोषणा देण्यात आल्या. त्यांच्या भाषणादरम्यान व्यत्ययदेखील आणला गेला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण होत होते. दरम्यान उत्तर गाझामध्ये इस्राएलच्या हल्ल्यांमुळे महिनाभरत १ हजाराहून अधिक लोक मारले गेले आहेत.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या सभेत घोषणा देणारे लोक हमासच्या हल्ल्यात मारले गेलेल्यांचे कुटुंबीयांचे नातेवाईक होते. गेल्या वर्षी हमासचा हल्ला रोखता न आल्याबद्दल अनेक इस्राएली लोक नेतान्याहूंना दोष देतात. यामध्ये अशा लोकांचाही समावेश आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांना हमासने ओलीस ठेवले आहे.
बेघर निवारा गृहांनाही केले लक्ष्य
या महिन्यात आतापर्यंत उत्तर गाझामध्ये इस्राएलच्या हल्ल्यांमुळे १ हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत. त्याचवेळी, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हा आकडा आणखी वाढू शकतो. कारण रुग्णवाहिकेअभावी सर्वच लोकांना रुग्णालयात पोहोचता येत नाही. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्राएलने बेघर लोकांसाठी ५ निवारा गृहांनाही लक्ष्य केले आहे. गाझा येथे इस्राएलच्या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना स्थानिक लोकांच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात आले. उत्तर गाझा येथे शनिवारी झालेल्या हवाई हल्ल्यात सुमारे ४० लोक मारले गेले. त्याबरोबरच इस्राएलने उत्तर गाझामधील बीत लाहिया भागातील एका निवासी इमारतीला लक्ष्य केले होते. या हल्ल्यात ८० हून अधिक लोक जखमीही झाले आहेत.
हिजबुल्लाहच्या आणखी एका कमांडरची हत्या
इस्राएली सैन्याने रविवारी सांगितले की, त्यांनी दक्षिण लेबनॉनमधील बिंट जबेल भागात हिजबुल्लाह कमांडर अहमद जाफर माटौकला ठार केले आहे. दुसऱ्या दिवशी, सैन्याने माटौकचा उत्तराधिकारी तसेच हिजबुल्लाहचा तोफखाना कमांडर बिंट जबीलला ठार मारले. हे तिघेजण दक्षिण लेबनॉनमध्ये इस्राएली सैन्याविरुद्ध टँकविरोधी क्षेपणास्त्रांचा वापर करत होते. रविवारी झालेल्या हल्ल्याची माहिती फेसबुक पोस्ट करून देण्यात आली. इस्राएली सुरक्षा दलाने (आयडीएफ) हिजबुल्लाहचे सुमारे १३० रेडी टू फायर लाँचर्सही नष्ट केले आहेत. याशिवाय १६० रॉकेटने सुसज्ज असलेले ४ मोबाईल लाँचरही इस्राएली लष्कराने नष्ट केले आहेत. इस्राएलवर लेबनॉनमधून ७५ रॉकेटने हल्ला केला. इस्राएल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने सांगितले की, रविवारी लेबनॉनमधून सुमारे ७५ रॉकेट डागण्यात आले. यातील अनेक रॉकेट हवेत नष्ट करण्यात आले. काही रॉकेट निवासी भागासह विविध ठिकाणी पडले. या हल्ल्यात गॅलीलीतील तामरा भागातील एका इमारतीचे नुकसान झाले आहे. हल्ल्यामुळे इमारत आणि जवळपास उभ्या असलेल्या वाहनांना आग लागली. यावेळी अनेक जण जखमीही झाले, ज्यांना नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रिव्हेंटिव्ह वॉरफेअर युद्धनीती
भारताने कारगिल युद्धामध्ये वापरलेली प्रिव्हेंटिव्ह वॉर म्हणजेच बचावात्मक युद्धनीतीचा उपयोग इस्राएल सध्या इराणच्या संदर्भात करीत आहे. युद्ध मोठ्या प्रमाणावर पसरून तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होते की काय अशी परिस्थिती सध्या मध्य आशियामध्ये आहे. त्यामुळे हिजबुल्लाहने केलेला हल्ला हा इराणप्रणीत होता, हे स्पष्ट झाल्यानंतर महायुध्द सुरू होऊ नये परंतु इराणपर्यंत योग्य संदेश पोहोचावा यासाठी इस्राएलने प्रिव्हेंटिव्ह वॉर ही हल्ल्याची पद्धत निवडल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.