लाखो रुपये खर्चून बाहुलीशी लग्न
टोकियो
जपानमधील बहुसंख्य लोक लग्न करत नाहीत आणि त्यामुळेच जपानची लोकसंख्या झपाट्याने घटत आहे. तरुणांची संख्या कमी होत असून वृद्धांची संख्या वाढत आहे, जी अर्थव्यवस्थेसाठी चांगली गोष्ट नाही. अशातही, जे लोक लग्न करत आहेत, ते अशा गोष्टींशी लग्न करत आहेत, जे अत्यंत विचित्र आहे आणि देशाला याचा काही फायदाही नाही. अलीकडेच एक जपानी माणूस एका 'कार्टून' पात्राच्या इतका प्रेमात पडला की त्याने आधी त्या कार्टूनची माणसासारखी दिसणारी बाहुली बनवली आणि मग तिच्याशी लग्न केले.
अकिहिको कोंडो नावाचा हा माणूस बऱ्याच दिवसांपासून या कार्टून पात्राच्या प्रेमात होता. आता त्याने या कार्टूनमधील पात्राशी लग्नच केले आहे. सध्या तो एका नवीन प्रकारच्या नात्याचा प्रचार करत आहे. या नात्याचे नाव आहे, 'फिक्टोसेक्शुअल'. म्हणजेच असे नाते ज्यामध्ये एखादी व्यक्ती एखाद्या काल्पनिक पात्राच्या प्रेमात पडते आणि तिच्यासोबत राहण्याचे स्वप्न पाहू लागते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अकिहिको याने असे करण्यामागचे अचाट कारणही सांगितले आहे.
अकिहिको या जपानी व्यक्तीने सांगितले की, लोक त्याला वेडा, विचित्र आणि मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती म्हणायचे. या कारणामुळे त्याने 'फिक्टोसेक्सअल असोसिएशन'ची सुरुवात केली, ज्याद्वारे त्याला लोकांना या नवीन प्रकारच्या नातेसंबंधाची माहिती देता येईल. सध्या त्याच्या या असोसिएशनमध्ये केवळ चार सदस्य आहेत. तो स्वतः या कार्टून पात्राच्या प्रेमात तर आहेच. परंतु, त्याला जगाला या नवीन प्रकारच्या प्रेमाबद्दल सांगायचे असल्याचे अकिहिकोचे म्हणणे आहे.
आता अशा प्रकारचे खूळ जपानमध्ये फोफावत असल्याने सरकारच्या डोकेदुखीत भर पडली आहे. आधीच लोकसंख्या कमी. त्यात युवकांमध्ये विवाहाचा कल कमी, मुलांची संख्या आणखी कमी. जे लोक विवाह करत नाहीत, ते असे काही खूळ डोक्यात भरून जगत आहेत.
अकिहिको हे ४० वर्षांचे असून ते सरकारी अधिकारी आहेत. त्यांनी २०१८ मध्ये कार्टून कॅरेक्टरच्या डॉलशी लग्न केले. अकिहिकोने या लग्नासाठी १३ लाखांपेक्षा जास्त खर्च केला आहे. या विवाह सोहळ्याला एकूण ४० पाहुणे उपस्थित होते. पण त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या लग्नाला येण्यास नकार दिला, कारण त्यांना अशा लग्नात सहभागी व्हायचे नव्हते. कोंडोला आता 'फिक्टोसेक्शुअल रिलेशनशिप' चा जनक मानले जात आहे.