इराणच्या डोकेदुखीत आणखी वाढ; सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी गंभीर आजारी

तेहरान : एकीकडे इस्राएलसोबतचे युद्ध, त्यात पाश्चिमात्य जगताचा इस्राएलला असणारे उघड समर्थन, मुस्लीम जगताकडून पुरेशा प्रमाणात न मिळणारे पाठबळ अशा संकटांना सामोरे जाणाऱ्या इराणच्या डोकेदुखीत आता आणखी वाढ झाली आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मोजतबा खामेनी होणार नवे उत्तराधिकारी

तेहरान : एकीकडे इस्राएलसोबतचे युद्ध, त्यात पाश्चिमात्य जगताचा इस्राएलला असणारे उघड समर्थन, मुस्लीम जगताकडून पुरेशा प्रमाणात न मिळणारे पाठबळ अशा संकटांना सामोरे जाणाऱ्या इराणच्या डोकेदुखीत आता आणखी वाढ झाली आहे. सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी गंभीर आजाराने त्रस्त असून इराणमध्ये नेतृत्वबदलाची शक्यता आहे.    

इस्राएलवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इस्राएली हवाई दलाने इराणच्या लष्करी तळांवर शनिवारी (२६ ऑक्टोबर) भीषण हल्ला केला. तब्बल १०० हून अधिक लढाऊ विमानांनी हा हल्ला करण्यात आला.  या हल्ल्यात इराणचा क्षेपणास्त्र निर्मिती कारखाना नष्ट केला. दरम्यान, इस्राएलच्या हल्ल्याची जखम ताजी असताना इराणसाठी आणखी एक वाईट बातमी पुढे आली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी गंभीर आजारी असल्याचे समोर आले आहे. लवकरच ते  आपला उत्तराधिकारी घोषित करण्याची शक्यता आहे.

खामेनी यांचा मोठा मुलगा मोजतबा खामेनी (वय ५५) याची त्यांचा उत्तराधिकारी म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. खामेनी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा उत्तराधिकारी म्हणून कुणाची निवड केली जावी याचाही विचार इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स करत असल्याची माहिती समोर आली आहे. रुहोल्ला खोमेनी यांच्या निधनानंतर १९८९ पासून अयातुल्ला अली खामेनी इराणचे सर्वोच्च नेते म्हणून कार्यरत आहेत. गेल्या वर्षी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू  झाल्यानंतर इराणच्या उत्तराधिकाऱ्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. रईसी यांच्या मृत्यूनंतर संभाव्य उत्तराधिकारी कुणाला निवडावे यासाठी इराणमध्ये अस्वस्थता आहे. इस्राएलने केवळ इराणच नव्हे तर इराक आणि सीरियावरही हल्ले केले आहेत. त्यामुळे इराणचा पेच वाढला आहे. इराणचे मित्रपक्ष आपापल्या बचावात गुंतले आहेत. याशिवाय अर्थव्यवस्थाही ढासळत चालली आहे. या आव्हानादरम्यान सर्वोच्च नेत्याच्या आजारपणामुळे इराणसमोरील आव्हानात भर पडली आहे.

इराणच्या लष्कराने शनिवारी रात्री  एक निवेदन जारी केले. त्यात गाझापट्टी आणि लेबनॉनमध्ये शस्त्रसंधीची सूचना करण्यात आली होती. इस्राएलविरोधात कोणत्याही प्रत्युत्तरात्मक कारवाईपेक्षा हा एक चांगला मार्ग ठरेल, असे लष्कराने म्हटले आहे. मात्र, प्रत्युत्तर देण्याचा अधिकार इराणला आहे, असेही त्यात म्हटले आहे.  इराणच्या लष्कराने पुढे म्हटले आहे की, इस्राएलने आपले हल्ले करण्यासाठी इराकच्या हवाई हद्दीत स्टँड-ऑफ क्षेपणास्त्रांचा वापर केला. या हल्ल्यात इराणच्या लष्करी रडार यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest