संग्रहित छायाचित्र
टोकियो : जपानमध्ये गेली पंधरा वर्ष सत्तेत असलेल्या लिबरल पक्षाला नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बहुमत गमवावे लागले आहे. जपानमधील सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) आघाडीला संसदेत बहुमत मिळवता आलेले नाही. एलडीपीला केवळ १९१ जागा मिळाल्या आणि त्यांनी ६५ जागा गमावल्या. मागील १५ वर्षांतील पक्षाची ही सर्वांत वाईट कामगिरी आहे. एलडीपी आणि कोमेटो मित्र पक्षाच्या आघाडीला एकूण २१५ जागा मिळाल्या आहेत. परंतु सरकार चालवण्यासाठी युतीला २३३ जागा मिळवाव्या लागतील.
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी गेल्या महिन्यात निवडणूक जिंकली होती. त्यानंतर ते देशाचे पंतप्रधान झाले. यानंतर इशिबाने निवडणूक घेण्याची घोषणा केली होती. निवडणुकीच्या निकालानंतर जपानी पंतप्रधान म्हणाले की, निवडणुकीचे निकाल त्यांच्या बाजूने लागलेले नाहीत. जनतेने कठोर निवाडा दिला आहे. ते नम्रपणे ते स्वीकारत आहेत, परंतु सध्या ते आणखी पक्ष जोडण्याचा प्रयत्न करत नाहीत.
निवडणुकीपूर्वी जपानी मीडियामध्ये असा दावा केला जात होता की, एलडीपीला बहुमत मिळाले नाही तर पंतप्रधान इशिबा पद सोडू शकतात. असे झाले असते तर ते दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वात कमी कालावधीसाठी पंतप्रधान म्हणून काम करणारे व्यक्ती बनले असते. मात्र, आपण या पदावर कायम राहणार असल्याचे इशिबाने सांगितले.
भ्रष्टाचारामुळे पक्ष आला अडचणीत
सन २००९ नंतर एलडीपीला बहुमत न मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, बहुमत न मिळण्यामागील कारण म्हणजे एलडीपी नेते अनेक घोटाळ्यांमध्ये वेढलेले आहेत. यामुळेच लिबरल पक्षाची लोकप्रियता सतत घसरत चालली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, एलडीपीचे मंजुरी रेटिंग वीस टक्क्यांच्या खाली घसरले.
लिबरल पक्षाचे खासदार पक्षाला मिळालेल्या राजकीय देणग्यांचा अपहार केल्याचा आरोप होता. खात्यात फेरफार करून त्यांनी पक्षाचे पैसे स्वतःच्या खात्यात वर्ग केले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पीएम किशिदा यांनी अनेक कॅबिनेट मंत्री आणि इतरांना त्यांच्या पदावरून हटवले होते. मात्र, यामुळे जनतेचा रोष शांत झाला नाही. यामुळे फुमियो किशिदा यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
एलडीपीचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी, जपानच्या कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रॅटिक पार्टी (सीडीपी) ने चांगली कामगिरी केली. सीडीपी नेते योशिहिको नोडा म्हणाले की, ते सध्याचे सरकार घालवण्यासाठी युती करण्याचा प्रयत्न करत आहेत. सीडीपी आघाडीकडे सध्या १६३ जागा असून ते सरकार स्थापनेपासून दूर आहे. एनएचके न्यूजनुसार, यावेळी महिलांनी विक्रमी मतांनी जपानमध्ये खासदार बनण्यात यश मिळवले आहे. यावेळी ४६५ जागांच्या सभागृहात ७३ महिला विजयी झाल्या. सन २०२१ मध्ये केवळ ४५ महिला निवडणूक जिंकू शकल्या.