PV Sindhu (File Pic)
Yonex-Sunrise India Open 2025 (PV Sindhu) | भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही .सिंधू तिच्या 2025 च्या मोसमाची सुरुवात योनेक्स-सनराईज इंडिया ओपन (Yonex-Sunrise India Open Super 750 Badminton Tournament) या स्पर्धेने करणार आहे. इंडिया ओपन सुपर 750 ची तिसरी आवृत्ती इंदिरा गांधी स्टेडियमच्या केडी जाधव हॉलमध्ये 14 जानेवारीपासून सुरू होईल, जिथे जगभरातील खेळाडू सहभागी होताना दिसतील. गेल्या वर्षी विवाहबद्ध झालेली सिंधू यावेळी सुपर 750 स्पर्धेत महिला एकेरीत खेळताना दिसू शकते. पीव्ही सिंधूने शेवटच्या वेळी सय्यद मोदी इंटरनॅशनल चॅम्पियनशिप 2024 मध्ये भाग घेतला होता, जिथे तिने चीनच्या लुओ यू वूचा सरळ सेटमध्ये पराभव करून सुवर्णपदक जिंकले होते.
सुपर 750 ही भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने आयोजित केलेली मुख्य स्पर्धा आहे, स्पर्धेच्या या आवृत्तीत, ऑलिम्पिक चॅम्पियन व्हिक्टर एक्सेलसेन, ॲन से यंग आणि जगातील नंबर वन शी युकी मैदानावरील चाहत्यांमध्ये आपली जादू पसरवताना दिसतील.
ही स्पर्धा सुरुवातीपासून BWF वर्ल्ड टूरचा एक भाग आहे, जिथे विजेत्याला US$9,50,000 (अंदाजे रु. 8.15 कोटी)बक्षीस रक्कम आणि 11000 गुण मिळतात. या स्पर्धेच्या तिसऱ्या आवृत्तीत यजमान भारताचे 21 खेळाडू सहभागी होणार आहेत. भारताकडून पुरुष एकेरीमध्ये 3, महिला एकेरीमध्ये 4, पुरुष दुहेरीमध्ये 2, महिला दुहेरीमध्ये 8 आणि मिश्र दुहेरीमध्ये 4 खेळाडू आपला दावा सादर करतील. गेल्या दोन आवृत्त्यांमध्ये भारताच्या 14 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
या आवृत्तीत सर्वांच्या नजरा पुरुष दुहेरीत आशियाई सुवर्णपदक विजेता सात्विकसाईराज रँकीरेड्डी-चिराग शेट्टी, आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेता एचएस प्रणॉय यांच्यावर असतील. सात्विक-चिराग या जोडीने गेल्या वेळी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती, तर प्रणॉयचा प्रवास अंतिम चारमध्ये संपुष्टात आला होता. सात्विक-चिराग व्यतिरिक्त भारताच्या नजरा माजी चॅम्पियन लक्ष्य सेन आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती सिंधू यांच्यावर असणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होणारे भारतीय खेळाडू...
पुरुष एकेरी - लक्ष्य सेन, एचएस प्रणॉय, प्रियांशू राजावत
महिला एकेरी - पी.व्ही.सिंधू, मालविका बनसोड, अनुपमा उपाध्याय, अक्षरी कश्यप
पुरुष दुहेरी - चिराग शेट्टी/सात्विकसाईराज रँकीरेड्डी, के साई प्रतिक/पृथ्वी के. रॉय
महिला दुहेरी - त्रिसा जॉली/गायत्री गोपीचंद, अश्विनी पोनप्पा/तनिषा क्रेस्टो, रुतुपर्णा पांडा/श्वेतपर्णा पांडा, मानसी रावत/गायत्री रावत, अश्विनी भट/शिखा गौतम, साक्षी गेहलावत/अपूर्व गेहलावत, सानिया सिकंदर/रश्मी गणेश, मृण्मयी देशपांडे/प्रेरणा आल्वेकर.
मिश्र दुहेरी- ध्रुव कपिला/तनिषा क्रेस्टो, के सतीश कुमार/आद्या वरियथ, रोहन कपूर/जी रुत्विका शिवानी, असिथ सूर्या/अमृता प्रमुथेश.