जेम्स फ्रँकलीन सनरायझर्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी

हैदराबाद न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू जेम्स फ्रँकलीन आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा नवा प्रशिक्षक असेल.

JamesFranklinasbowlingcoachofSunrisers

जेम्स फ्रँकलीन सनरायझर्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी

 तो दक्षिण आफ्रिकेचा महान वेगवान गोलंदाज डेल स्टेनची जागा घेणार आहे. स्टेनने वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे.

 यावेळी सनरायझर्स संघ आपला कर्णधारदेखील बदलू शकतो. दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमऐवजी ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स नवा कर्णधार ठरू शकतो.

जेम्स फ्रँकलीन  २०११ आणि २०१२ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळला. तो प्रथमच आयपीएलमध्ये कोचिंग करताना दिसणार आहे. फ्रँकलीन आपलाच देशबांधव आणि  माजी फिरकीपटू डॅनियल व्हिटोरीसोबत काम करेल. या हंगामासाठी व्हिटोरीला हैदराबादचा नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. त्याने वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराची जागा घेतली.

फ्रँकलीन आणि व्हिटोरी यांनी यापूर्वी काउंटी टीम मिडलसेक्स आणि द हंड्रेड टीम बर्मिंगहॅम फिनिक्समध्ये एकत्र काम केले आहे. डरहॅम संघाचा मुख्य प्रशिक्षक असलेला फ्रँकलीन सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये इस्लामाबाद युनायटेडच्या कोचिंग स्टाफचा भाग आहे.

फ्रँकलीन सनरायझर्समध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून रुजू होणार आहे. भुवनेश्वर कुमार, पॅट कमिन्स, मार्को जॅन्सन, उमरान मलिक, थंगारासू नटराजन, फजलहक फारुकी, जयदेव उनाडकट आणि अनकॅप्ड आकाशसिंग यांसारख्या गोलंदाजांकडून सर्वोत्तम कामगिरी करवून घेण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल.

शिवाय हैदराबादकडे वानिंदू हसरंगा, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा आणि शाहबाज अहमद यांसारखे अव्वल दर्जाचे फिरकीपटू आहेत. त्यांच्याकडून फ्रँकलीन कशी कामगिरी करवून घेतो, याकडेही लक्ष असेल.

फ्रँकलीन आणि व्हिटोरीवर पहिली जबाबदारी सनरायझर्सला प्लेऑफमध्ये नेण्याची असेल. दोन वेळचा आयपीएल चॅम्पियन असलेला हा संघ गेल्या दोन हंगामात गुणतालिकेत लौकिकास साजेशी कामगिरी करू शकला नाही. हैदराबादला २०२२मध्ये आठव्या तर २०२३ मध्ये तळाच्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest