संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) विद्यमान अध्यक्ष जय शाह यांनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावायला सुरूवात केली आहे.
आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ संपत आहे. ते दोनदा या पदावर होते. बार्कले यांनी मंगळवारी (दि. २०) तिसर्या कार्यकाळासाठी नकार दर्शवला आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आयसीसीचे पुढील अध्यक्ष म्हणून जय शाह यांच्याकडे लागल्या आहेत.
न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले हे नोव्हेंबर २०२० मध्ये पहिल्यांदा या पदावर निवडून आल्यानंतर २०२२ मध्ये पुन्हा एकदा त्यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबर रोजी संपत आहे. आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ ऑगस्ट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी ६ दिवसांत आयसीसीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने जय शाह यांना आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला आहे. ग्रेग बार्कले यांनी आपल्या तिसर्या कार्यकाळासाठी आयसीसीच्या आगामी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे जय शाह यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे.
आयसीसीचे सर्वात तरूण अध्यक्ष होण्याची संधी
जय शाह वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी आयसीसीचे अध्यक्ष बनून इतिहास रचू शकतात. असे झाल्यास ते आयसीसीचे सर्वांत तरुण अध्यक्ष ठरतील. जय शाह यांच्याआधी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन. श्रीनिवासन आणि शशांक मनोहर या भारतीय क्रिकेटमधील प्रशासकांनी आयसीसीचे अध्यक्षपद भूषवले आहे. आयसीसीच्या नवीन नियमांनुसार एखादी व्यक्ती दोनदा अध्यक्ष होऊ शकते आणि प्रत्येक कार्यकाळ दोन वर्षांचा असेल.
बीसीसीआयमध्ये २०१५ मध्ये एन्ट्री
जय शाह यांची २००९ मध्ये क्रिकेट प्रशासनात एन्ट्री झाली होती. त्याआधी ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव पद सांभाळत होते. त्यानंतर २०१५मध्ये जय शाह बीसीसीआयमध्ये सहभागी झाले आणि सप्टेंबर २०१९ मध्ये मंडळाचे सचिवही झाले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.