संग्रहित छायाचित्र....
ICC Men’s Player of the Month for December 2024 | भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला नुकत्याच संपलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये प्रभावी कामगिरी केली होती. आता आयसीसीने त्याला डिसेंबर 2024 च्या महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी नामांकित केले आहे. त्याच्यासोबत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आणि दक्षिण आफ्रिकेच्या डॅन पॅटरसन यांनाही नामांकन मिळाले आहे. आयसीसीनं मंगळवारी याबाबत घोषणा केली आहे. आता क्रिकेट चाहत्यांची मतं आणि कामगिरीच्या निकषांच्या आधारे या तिघांपैकी कुणाला हा पुरस्कार मिळणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. या पुरस्काराचे विजेते निवडण्यासाठी चाहत्यांनाही आपले मत देता येणार आहे. चाहते पुढील तीन दिवसात आयसीसीच्या वेबसाइटद्वारे मत देऊ शकतात.
Three standout pacers have been nominated for ICC Men’s Player of the Month for December 2024 🏏
— ICC (@ICC) January 7, 2025
1 पुरस्कार आणि 3 दावेदार....
बुमराहने डिसेंबरमध्ये तीन कसोटी सामन्यांमध्ये 14.22 च्या सरासरीने 22 विकेट्स घेतल्या होत्या. 31 वर्षीय या वेगवान गोलंदाजाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये पाच कसोटी सामन्यांमध्ये एकूण 32 विकेट्स घेतल्या. सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात पाठीच्या दुखण्यामुळे बुमराह यजमान संघाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करू शकला नव्हता.बुमराहने ब्रिस्बेन आणि मेलबर्नमध्ये प्रत्येकी नऊ विकेट्स घेतल्या, ज्यामुळे भारताला यजमानांना कठीण आव्हान देण्यात मदत झाली. महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराच्या शर्यतीत बुमराहसमोर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेन पॅटरसन यांचे आव्हान असेल.
कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धची मालिका 3-1 अशी जिंकली आहे. डिसेंबरमध्ये भारताविरुद्ध झालेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाज कमिन्सने 17.64 च्या सरासरीने 17 विकेट्स घेतल्या होत्या. कमिन्सने अॅडलेड येथे 57 धावांत पाच बळी घेत महिन्यातील सर्वोत्तम कामगिरी केली आणि यजमान संघाला 10 विकेटने आरामदायी विजय मिळवून दिला. कमिन्सने मेलबर्नमध्ये फलंदाजीत 49 आणि 41 धावांच्या उपयुक्त खेळीदेखील केल्या होत्या.
पॅटरसनने श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध शानदार गोलंदाजी केली आणि त्याच्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने दोन कसोटी सामन्यांमध्ये 16.92 च्या सरासरीने 13 विकेट्स घेतल्या आणि दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला जिथे त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.