AUS vs SL : आगामी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, कमिन्सच्या जागी 'या' खेळाडूला मिळाली कर्णधारपदाची धुरा...

ऑस्ट्रेलिया संघाने श्रीलंकेविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. या मालिकेसाठी संघाने नवीन कर्णधाराची नियुक्ती केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 9 Jan 2025
  • 12:41 pm
AUS vs SL  Test,

संग्रहित छायाचित्र....

Australia vs Sri Lanka : भारताविरुद्ध दहा वर्षांनी बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकून आणि पुन्हा एकदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ चांगलाच फाॅर्मात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा आता करण्यात आली आहे. या मालिकेसाठी संघाने मोठा निर्णय घेतला आहे. संघानं पॅट कमिन्सला विश्रांती दिली आहे आणि स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपद सोपवले आहे, तर ट्रॅव्हिस हेडची संघाचा नवीन उपकर्णधार म्हणून निवड केली आहे.

मिचेल मार्श संघाबाहेर

भारताविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये तीन सामने खेळल्यानंतर वगळण्यात आलेल्या नॅथन मॅकस्विनीचेही या संघात पुनरागमन झाले आहे. त्याने मालिकेत 14.4 च्या सरासरीने 72 धावा केल्या. राष्ट्रीय संघात येण्यापूर्वी त्याने शेफील्ड शिल्डमध्ये कधीही सलामी दिली नसल्याने त्याला मधल्या फळीत स्थान मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून दुखापतींशी झुंजत असलेल्या अनुभवी खेळाडू मिशेल मार्शला संघ निवडकर्त्यांनी वगळले आहे.

संघाला कमिन्स-हेझलवूडची भासेल उणीव...

घोट्याच्या दुखापतीमुळे कमिन्स आणि हेझलवूडच्या अनुपस्थितीत, श्रीलंकेविरुद्ध कांगारू संघात मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड आणि शॉन अ‍ॅबॉट हे तीनच वेगवान गोलंदाज आहेत. जर ऑस्ट्रेलियाने लिऑन, कुहनेमन आणि मर्फी हे तीन प्रमुख फिरकीपटू मैदानात उतरवले तर वेगवान गोलंदाजांपैकी फक्त एकच खेळेल अशी शक्यता आहे. संघात दुसरा आणि तिसरा फिरकीपटू म्हणून टॉड मर्फी आणि मॅट कुहनेमन यांची निवड करण्यात आली असून ते नॅथन लायनला साथ देताना दिसतील. 2024 मध्ये फिरकी गोलंदाजांविरुद्धचा चांगला रेकॉर्ड आणि प्रभावी प्रथम श्रेणी कामगिरी असूनही पीटर हँड्सकॉम्बलाही संघातून वगळण्यात आले आहे, तर जोश इंग्लिस हा दुसरा बॅक-अप फलंदाज आहे.

श्रीलंकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, स्कॉट बोलँड, अ‍ॅलेक्स कॅरी, कूपर कॉनोली, ट्रॅव्हिस हेड (उपकर्णधार), जोश इंगलिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टॅस्क, मॅट कुह्नेमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन , नॅथन मॅकस्वीनी, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर.

Share this story

Latest