संग्रहित छायाचित्र....
Team India : भारतीय क्रिकेट संघाला सतत अडचणी येत आहेत. दुखापतीमुळे मोहम्मद शमी बराच काळ भारतीय संघाबाहेर आहे. अलीकडेच, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करणारा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यालाही दुखापत झाल्याची बातमी समोर आली. आता भारतीय संघातील आणखी एक वेगवान गोलंदाज अनफिट असल्याची बातमी समोर आली आहे. तो गोलंदाज म्हणजे आकाश दीप. तिन्ही गोलंदाजांच्या दुखापतीमुळे भारतीय गोलंदाजीच्या आक्रमणावर मोठा परिणाम होऊ शकतो.
आकाश दीप झाला दुखापतग्रस्त...
आॅस्ट्रेलियाविरूद्दच्या पाचव्या कसोटीपूर्वी वेगवान गोलंदाज आकाश दीपला पाठीला दुखापत झाली होती, याची पुष्टी माजी क्रिकेटपटू व संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने केली होती. शेवटच्या कसोटीत त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा समावेश करण्यात आला. आता बातमी अशी आहे की, दुखापतीमुळे आकाश दीप विजय हजारे ट्रॉफीच्या बाद फेरीत सहभागी होऊ शकणार नाही. रिपोर्टनुसार, आकाश दीप बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) मध्ये रिकव्हरी करेल. आकाश दीपने 2024-25 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 2 कसोटी सामने खेळले. या दोन कसोटी सामन्यांच्या 4 डावात त्याने 54 च्या सरासरीने 5 बळी घेतले होते.
बुमराह इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर?
रेव्हस्पोर्ट्झच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह 6 फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडू शकतो. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याच्या उपलब्धतेबद्दल संघ व्यवस्थापनालाही चिंता आहे. या वृत्तात म्हटले आहे की, बुमराहची स्पर्धेसाठी संघात निवड होऊ शकते, परंतु तो सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडू शकतो. तो बाद फेरीत परतेल अशी अपेक्षा आहे. दुसऱ्या एका वृत्तानुसार, बुमराह लवकरच बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाचा आणि त्याच्या वैयक्तिक डॉक्टरांचा सल्ला घेईल. 2022 मध्ये त्याला शेवटची दुखापत झाली होती, तेव्हा न्यूझीलंडमध्ये त्याची शस्त्रक्रिया झाली होती.