Fixing in Cricket : क्रिकेटमध्ये पुन्हा फिक्सिंग?

माजी क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामी (Srivatsa Goswami) याने बंगाल क्रिकेट असोसिएशनतर्फे (Cricket Association of Bengal ) (कॅब) सुरु असलेल्या अ श्रेणी लीग मॅचमध्ये फिक्सिंग झाल्याचा आरोप केला आहे. फिक्सिंगचे भूत पुन्हा मानगुटीवर बसण्याच्या शक्यतेमुळे भारतीय क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

Fixing in Cricket

क्रिकेटमध्ये पुन्हा फिक्सिंग?

बंगालच्या अ श्रेणी लीगमध्ये फिक्सिंगचा आरोप, माजी क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामीने केला फलंदाजांच्या बाद होण्याच्या पद्धतीवर सवाल उपस्थित

कोलकाता : माजी क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामी (Srivatsa Goswami)  याने बंगाल क्रिकेट असोसिएशनतर्फे (Cricket Association of Bengal )  (कॅब) सुरु असलेल्या अ श्रेणी लीग मॅचमध्ये फिक्सिंग झाल्याचा आरोप केला आहे. फिक्सिंगचे भूत पुन्हा मानगुटीवर बसण्याच्या शक्यतेमुळे भारतीय क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

श्रीवत्स गोस्वामी हा ज्युनिअर विश्वचषकात खेळलेल्या भारतीय संघातील विराट कोहलीचा सहकारी आहे. मोहम्मडन स्पोर्टिंग आणि टाऊन क्लब यांच्यातील सामन्याचे दोन व्हिडिओ त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. मोहम्मडन स्पोर्टिंग क्लबचे फलंदाज ज्या पद्धतीने बाद झाले त्यावर श्रीवत्स गोस्वामीने प्रश्न उपस्थित केले आहेत. कॅबकडून या प्रकरणाची तातडीने दखल घेण्यात आली आहे. भारताचा माजी कर्णधार असलेल्या सौरभ गांगुलीचा भाऊ असलेले कॅबचे अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली यांनी टूर्नामेंट लीग समितीकडून या घटनेचा अहवाल मागवला आहे.

गोस्वामीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, कोलकाता क्लब क्रिकेटमधील हा सुपर डिव्हिजन सामना आहे, दोन मोठे संघ असे करत आहेत, तुम्हाला माहिती आहे का इथे काय चालले आहे? माझ्या हृदयाच्या खूप जवळ असलेला खेळ मी खेळला, याची मला आता लाज वाटते. मला क्रिकेट आवडते आणि मला बंगालमध्ये खेळायला आवडते, पण हे पाहून माझे हृदय तुटले आहे. क्लब क्रिकेट हे बंगाल क्रिकेटचे हृदय आणि आत्मा आहे, कृपया ते नष्ट करू नका. मला वाटतं याला 'गॉट अप' क्रिकेट म्हणतात. मीडिया आता कुठे आहे?’’

गोस्वामीने शेअर केलेल्या पहिल्या व्हीडीओमध्ये उजव्या हाताचा फलंदाज चेंडू स्टंपच्या दिशेने येताच सोडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे चेंडू विकेटला आदळतो आणि तो जणू बाद व्हायची वाट बघत होता अशा अविर्भावात मैदानाबाहेर निघतो.  दुसऱ्या व्हीडिओमध्ये डावखुरा फलंदाज क्रीजमधून बाहेर येऊन वाईड बॉल खेळत आहे. क्रीझबाहेर आल्यावर विकेटकीपर यष्टिचित करु शकतो, हे माहित असूनही तो क्रीझमध्ये परत येण्याचा कोणताही प्रयत्न करीत नाही. यादरम्यान, विकेटकीपरने स्टंपिंग केल्यावर फलंदाज तातडीने मैदान सोडतो.  या सामन्यात टाऊन क्लबने साकिब हबीब गांधीच्या २३३धावांच्या जोरावर ४४६धावा केल्या. प्रत्युत्तरात मोहम्मडन स्पोर्टिंग क्लब चा संघ ९ बाद २८१ धावाच करू शकला.  

बंगाल क्रिकेट संघटनेची आज बैठक

बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्नेहशिष गांगुली यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत शनिवारी (दि. २) या टूर्नामेंट समितीची बैठक बोलावली आहे. गांगुली म्हणाले, ‘‘हा प्रकार अतिशय गंभीर आहे. याप्रकरणी आम्ही २ मार्च रोजी संबंधित स्पर्धा समितीची बैठक बोलावली आहे. त्या सामन्यातील मैदानावरील पंचांकडूनही अहवाल मागवला आहे. सर्व बाजूंनी माहिती घेतल्यावर या प्रकरणी योग्य ता कारवाई करण्यात येईल.’’वृत्तसंंस्था

कोण हा श्रीवत्स गोस्वामी?

श्रीवत्स गोस्वामीने मागील वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. गोस्वामीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधीत्व करताना ९९ डावांमध्ये ३२.४६ च्या सरासरीने ३,०१९ धावा केल्या. यात ४ शतके  आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे. यादरम्यान नाबाद २२५ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.  

२००८मध्ये आयपीएलच्या पहिल्या सत्रात गोस्वामी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात होता. या स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू म्हणून त्याला नामांकन देण्यात आले होते. गोस्वामीने आयपीएलमध्ये एकूण ३१ सामने खेळले, ज्यामध्ये त्याने १४.६५ च्या सरासरीने २९३ धावा केल्या. शिवाय १७ झेल आणि ७ यष्टिचित अशी कामगिरीही त्याने केली. २००८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघात श्रीवत्स गोस्वामी याचा समावेश होता. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest