संग्रहित छायाचित्र
दुबई: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या पाच-सहा वर्षांपासून सर्व फॉरमॅटमध्ये अफलातून खेळ करतोय. त्यामुळे जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून त्याचे क्रिकेट विश्वावर राज्य केले आहे, अशी स्तुतीसुमने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगने उधळली आहेत.
एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पॉण्टिंग बुमराहबद्दल भरभरून बोलला. भारताच्या या स्टार गोलंदाजाच्या श्रेष्ठत्वाचे कौतुक करतानाच पॉण्टिंगने त्याच्या दीर्घकाळ खेळण्याबद्दलही चिंता व्यक्त केली. ‘‘नेहमीच दुखापतीने त्याला ग्रासले आहे, पण तो दुखापतीतून बरा होऊन पुन्हा सुस्साट सुटला आहे. त्याच्या दुखापतीची सर्वांनाच काळजी असते. तसे असले तरी तो गेल्या पाच-सहा वर्षातील जागतिक क्रिकेटमधला सर्वश्रेष्ठ गोलंदाज आहे. काही वर्षांपूर्वी दुखापती झाल्या तर भीती वाटायची की तो पहिल्यासारखा पुन्हा गोलंदाजी करू शकेल ना. पण त्याने वेळोवेळी जबरदस्त पुनरागमन करत आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे,’’ असे पॉण्टिंग म्हणाला.
पॉण्टिंग पुढे म्हणाला, ‘‘बुमराहसारख्या खेळाडूंबद्दल योग्य माहिती हवी असेल तर त्याच्या सहकारी खेळाडूंना विचारा. जेव्हा तुम्ही विरोधी फलंदाजांना त्याच्याबद्दल विचाराल तर ते नेहमीच एकच उत्तर देतात... ‘बुमराह हा एक दु:स्वप्न आहे. पुढे नेमके काय घडणार आहे, हे तुम्ही कधीही ओळखू शकत नाही.’ तो असा गोलंदाज आहे, तो इनस्विंगही करू शकतो, आऊटस्विंगही करू शकतो. तो कोणताही चेंडू स्विंग करू शकतो. त्याने टी-२० वर्ल्ड कपमध्ये आपल्या स्विंगची कमाल दाखवलीय. तो या वर्ल्ड कपमध्येही त्याच जोशात होता. तीच अचूकता होती. त्याच्या खेळात कोणताही बदल झाला नव्हता.’’
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.