Amruta Fadnavis : ट्रोलिंग मनावर घेत नाही ! अमृता फडणवीसांनी साधला ‘मिरर’शी मनमोकळेपणे संवाद

गायिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि आघाडीच्या बँकर अशा विविध आघाड्या यशस्वीपणे सांभाळणाऱ्या अमृता फडणवीस यांनी 'पुणे टाइम्स मिरर'च्या राजकीय संपादक शिखा धारिवाल यांच्याशी मनमोकळेपणे संवाद साधला. या मुलाखतीदरम्यान त्यांनी महिला सक्षमीकरण आणि समाजाची बदलती मानसिकता, सोशल मीडियावर होणारे ट्रोलिंग आणि त्यांच्या आगामी प्रकल्पांवर आपली मते व्यक्त केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 27 Oct 2023
  • 01:10 pm
Amrita Fadnavis

ट्रोलिंग मनावर घेत नाही ! अमृता फडणवीसांनी साधला ‘मिरर’शी मनमोकळेपणे संवाद

गायिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि आघाडीच्या बँकर अशा विविध आघाड्या यशस्वीपणे सांभाळणाऱ्या अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी 'पुणे टाइम्स मिरर'च्या (Pune Times Mirror) राजकीय संपादक शिखा धारिवाल (Shikha Dhariwal) यांच्याशी मनमोकळेपणे संवाद साधला. या मुलाखतीदरम्यान (interview) त्यांनी महिला सक्षमीकरण आणि समाजाची बदलती मानसिकता, सोशल मीडियावर होणारे ट्रोलिंग आणि त्यांच्या आगामी प्रकल्पांवर आपली मते व्यक्त केली.

महिला सक्षमीकरणाबाबत तुमचे काय मत आहे?

महिला सशक्तीकरण म्हणजे तुमची जीवनशैली निवडणे आणि स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य. हे निर्णय भलेही योग्य किंवा अयोग्य असू शकतात, परंतु या निर्णयांवर ठामपणे उभे राहणे. असे नेहमी म्हटले जाते की, स्त्रीला तिच्या आयुष्यात एक योग्य पुरुष मिळावा जो सर्व अडचणी आणि समस्यांदरम्यान तिच्या पाठीशी उभा राहील. पण का? ठामपणे उभे राहण्यासाठी पुरुषाची काय गरज आहे? प्रत्येक स्त्री खूप सक्षम असते, ती स्वतंत्रपणे सर्व गोष्टींचा मुकाबला करू शकत नाही का? माझ्या मते ती कायमच योग्य आणि सारासारविवेकबुद्धी वापरून योग्य ते निर्णय घेऊच शकते आणि यशस्वी होऊ शकते.

तुम्ही एक बँकर आहात, सामाजिक कार्यकर्त्या आहात आणि सर्जनशील क्षेत्रात आणि वैयक्तिक क्षेत्रात सक्रियपणे काम करत आहात, एक चांगली आई आणि पत्नी आहात, तुम्ही सर्व भूमिका इतक्या छानपणे कशा सांभाळता?

आपण नुकतीच नवरात्री साजरी केली आहे आणि दुर्गामातेचे विविध अवतार आणि त्यांच्या कर्तृत्वांची पूजा केली आहे. याचबरोबर ती एक महिला आहे, माता आहे, तिच्यात खूप प्रेम आणि आपुलकी आहे. तोच आदर्श आपण सर्वांनी ठेवला पाहिजे. कुठलीही गोष्ट तुम्ही प्रामाणिकपणे, उत्कटतेने कराल तर गोष्टी सोप्या होतात. माझ्यासारख्या अनेक महिला असतील ज्यांना विविध गोष्टी करायच्या असतील, विविध क्षेत्रात काहीतरी करून दाखवायचे असेल. माझे त्या सर्वांना हेच सांगणे असेल की त्यासाठी थांबून राहू नका. ज्या गोष्टी करण्यात तुम्हाला आनंद मिळतो ती गोष्ट करायला मागेपुढे बघू नका. माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर या सर्व गोष्टी करताना मी माझी सामाजिक आणि वैयक्तिक जबाबदारी विसरत नाही. त्यासाठी वेळेचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. आपल्या जवळच्या व्यक्ती जसे की माझी आज्जी, माझ्या सासूबाई यांना प्राधान्य देणे, वेळप्रसंगी त्यांची मदत घेणे हेही आवश्यक आहे. इतक्या विविध गोष्टी करताना घरच्यांची मायेची साथ लाभणे हे महत्त्वाचे आहे.

महिला आरक्षणाबाबत तुमचे काय मत आहे?

हे आमच्यासाठी एक महत्त्वाचे उद्दिष्ट होते. महिला आरक्षण विधेयक महिलांना नक्कीच सक्षम करेल आणि महिला शक्तीला आणखी बळकट करण्याचा मार्ग मोकळा करेल. आता राजकारणातही प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग अनेक पटींनी वाढेल. महिला या उत्तम व्यवस्थापक आहेत. या विधेयकामुळे निर्णय घेण्याच्या यंत्रणेत महत्त्वपूर्ण भूमिका घेण्याच्या त्यांच्या क्षमतांना वाव मिळेल. अद्यापही राजकारणात महिलांची संख्या अगदीच कमी आहे. मात्र यानंतर हे चित्र बदलत जाताना दिसेल. ही एक अतिशय सकारात्मक गोष्ट आहे आणि एका विकसित राष्ट्राचे लक्षण आहे. या महत्त्वाच्या कामगिरीबद्दल आपले लाडके पंतप्रधान मोदीजी यांची मी ऋणी आहे.

तुम्हाला राजकारणात रस आहे का आणि भविष्यात सक्रिय राजकारणात उतरणार का?

व्यक्तिशः माझा राजकारणापेक्षा समाजकारणाकडे (सामाजिक उपक्रम) जास्त ओढा आहे. जरी मी पूर्ण वेळ त्यासाठी देऊ शकत नसले तरी समाजातील खालच्या स्तरातील लोकांना मदत करणारे उपक्रम मला राबवायला आवडतात. माझ्या स्वयंसेवी संस्थेद्वारे आणि अनेक स्वयंस्फूर्तीने पुढे येणाऱ्या लोकांच्या गटाद्वारे आम्ही लोकांपर्यंत जात असतो आणि तळागाळातील लोकांना विकासाच्या माध्यमातून एक नवी दिशा देत असतो. माझ्या मते ही एक प्रकारची देवाचीच सेवा आहे.

समाजाची स्त्रीबद्दल असलेली धारणा बदलल्याचे जाणवते का?

मला वाटते, समाज झपाट्याने बदलत आहे, पण त्याचबरोबर महिलांची मानसिकताही बदलत आहे, जी प्रगतीशील समाजासाठी खूप चांगले लक्षण आणि सकारात्मक आहे. महिला आता अन्यायाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवू शकतात, कोणताही गुन्हा किंवा हिंसाचाराच्या विरोधात महिला स्वत: एफआयआर दाखल करतात. पूर्वी हे इतके सहजी होत नव्हते. त्यामुळे ‘मी टू’ चळवळीपासून ते एफआयआर नोंदवण्यापर्यंत ही नक्कीच मोठी झेप आहे. आता महिला घाबरून घरात बसत नाहीत. त्या छेडछाड किंवा बदनामीला न घाबरता आवाज उठवतात.

आपल्या समाजातूनही त्यांना आता पाठिंबा मिळत आहे. आता असे कुणी म्हणत नाही की, आवाज उठवू नको नाहीतर बदनामी होईल. त्यामुळे आताच्या महिला या आत्मविश्वासाने अन्यायाचा सामना करत आहेत.  हे केवळ वैयक्तिक आघाडीवर नाही तर व्यावसायिक आघाडीवरदेखील आहे. महिला खूप चांगले काम करत आहेत आणि आता प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे, मग ते राजकारण असो वा सनदी नोकरी किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात. हे आजचे वास्तव आहे.

तुम्ही ट्रोल कसे हाताळता, कारण तुम्हाला अनेकदा ट्रोल केले गेले आहे? या ट्रोलिंगचा तुमच्यावर परिणाम होतो का?

मला याची खूप सवय झाली आहे . गेल्या ९.५ वर्षांत मला बऱ्याच वेळा क्रूरपणे ट्रोल केले गेले आहे. शेवटी मी देखील एक माणूस आहे, मलाही काही भावना आहेत. सुरुवातीला अशा ट्रोलिंगचा माझ्यावर परिणाम व्हायचा आणि मला खूप त्रास, वेदना होत असत. अनेक नकारात्मक शेऱ्यांचा माझ्यावर खोलवर परिणाम होत असे. मात्र आता मला याची सवय झाली आहे आणि अशा ट्रोलिंगचा मला शांतपणे सामना करायला जमू लागले आहे. कारण मला समजले की, जर तुम्ही सार्वजनिक व्यासपीठावर असाल तर ते नक्कीच घडणार आहे. आता मी समतोल राखण्याचा प्रयत्न करते आणि ट्रोलिंग तपासते की मला ट्रोल का केले जाते आहे. जर त्यात काही खरोखरच महत्त्वाचा मुद्दा असेल तर त्याप्रमाणे मी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करते अन्यथा दुर्लक्ष करून सोडून देते. आता मी ट्रोलिंगला मनावर घेत नाही.

गेली अनेक वर्षे आपली ओळख आहे. तुम्ही बऱ्याच कालावधीपासून अनेक सामाजिक प्रकल्पांवर शांतपणे काम करत आल्या आहात, कृपया आम्हाला त्या प्रकल्पांबद्दल सांगा...

सध्या आमच्याकडे मुंबई पोलिसांच्या  कॉन्स्टेबल आणि महिला दलासाठी एक अतिशय चांगला प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे. आम्ही त्यांना निरोगीपणापासून नेतृत्वापर्यंत आरोग्यदायी ते आर्थिक इ. पर्यंतचे प्रशिक्षण देत आहोत. हा दोन दिवसांचा कार्यक्रम आहे. मुंबई पोलीस दलात सुमारे ७ हजार महिला आहेत आणि आमच्याकडे दोन दिवसांसाठी १५० ते २०,००० च्या बॅच आहेत त्यामुळे ते चालू आहे. दुसरा उपक्रम "मिट्टी के सितारे ." जिथे आम्ही गरीब, वंचित लोकांना संगीताचे प्रशिक्षण देत आहोत. पालघर येथे आम्ही बांधकाम महिला कामगारांच्या मुलांसाठी पाळणाघर आणि अशा माता आणि त्यांच्या मुलांसाठी वैद्यकीय तपासणी युनिट चालवत आहोत. आम्ही एका चांगल्या कार्यक्रमाची तयारी करत आहोत. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला १५ वर्षे पूर्ण झाल्याचा कार्यक्रम. येत्या २६ नोव्हेंबर रोजी 'गेट वे ऑफ इंडिया' येथे हा मेगा इव्हेंट होणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest