"आजचे पालकमंत्री उद्याचे मुख्यमंत्री", पुण्यात झळकले अजित पवारांचे बॅनर
मोनिका येनपूरे
"टायगर इज बॅक आजचे पालकमंत्री उद्याचे मुख्यमंत्री", अशा आशयाचे पुण्यात पोस्टर झळकलेले पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल पुण्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाली आहे. परंतु पुण्यामधून चंद्रकांत पाटील यांची पालकमंत्री पदाचे महत्त्वकांक्षा असताना त्यांना थेट अमरावती व सोलापूरला पाठवल्यामुळे ते नाराज असताना अशा प्रकारची पोस्टरबाजी कितपत योग्य आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार हे सहभागी झाल्यानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. आजचे पालकमंत्री उद्याचे मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस समोर झळकताना पाहायला मिळत आहेत. व्हि. व्हि. आय. पी. सर्किट हाऊस येथे आज चंद्रकांत पाटील यांची बैठक आहे. याच व्हि. व्हि. आय. पी. सर्किट हाऊसच्या समोर अजित पवार यांचे अशा आशयाचे बॅनर झळकत आहेत.
अजित पवार शरद पवारांना सोडून सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर ते केवळ मुख्यमंत्री पदाच्या अपेक्षेसाठी या शिंदे-फडणवीसांसोबत आल्याची चर्चा होती. त्यातच अजित पवार पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असल्याचा देखील मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत होतं. यावेळी त्यांचं नाराजी नाट्य देखील महाराष्ट्राला पाहायला मिळालं. आता पुण्याचे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागले आहेत का? असा सवाल उपस्थित होतोय. परंतु चंद्रकांत पाटलांची उचल बांगडी करत त्यांना थेट अमरावती व सोलापूरला पाठवल्यामुळे भाजप कार्यकर्ते आता ही सगळी गोष्ट कशी सहन करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.