...तर सरकारला सत्ता गमवावी लागेल, शरद पवारांचा इशारा
हजारो युवकांना आणि कार्यकर्त्यांना एकत्रित घेत आज आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या युवा संघर्ष यात्रेला (Yuva Sangharsh Yatra) पुण्यातून सुरुवात झालेली आहे. आज दसऱ्याच्या निमित्ताने सहभाग घेत हा कार्यक्रम पुण्यातील टिळक स्मारक मंदिरामध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. ‘सत्ता हातात ठेवायची असेल तर लोकशाहीच्या मार्गाने सुरू असेल्या या संघर्ष यात्रेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सरकारने यात्रेकडे दुर्लक्ष केल्यास सत्ता गमवावी लागेल, असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP president ) शरद पवार यांनी दिला.
पुणे ते नागपूर अशा ८०० किलोमीटरच्या या संपूर्ण युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून युवकांचे विविध प्रश्न रोहित पवार सरकारकडे मांडणार आहेत. यासाठी राज्यभरातील युवकांसह पुण्यातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे युवक देखील मोठ्या संख्येने युवा संघर्ष यात्रेमध्ये सहभागी झाले. यानिमित्ताने टिळक स्मारक मंदिरात पवार यांची सभा झाली. या सभेला युवा संघर्ष यात्रेचे आयोजक, आमदार रोहित पवार, खासदार श्रीनिवास पाटील आणि वंदना चव्हाण, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, “आठशे किलोमीटर अंतराचा प्रवास संघर्ष यात्रेकडून होणार आहे. हा प्रवास सुमारे पंचेचाळीस दिवसांचा आहे. ही यात्रा तरूणांना आत्मविश्वास देणारी ठरेल. यात्रेचा प्रांरभही उत्तम झाला आहे. युवा वर्गाचा कंत्राटी भरतीचा मुद्दा यात्रेच्या सुरूवातीलाच उपस्थित करण्यात आला आणि सरकारला त्याबाबतचा निर्णय मागे घ्यावा लागला. हे या यात्रेचे यश आहे. त्यामुळे या यात्रेकडे सरकारला दुर्लक्ष करता येणार नाही.”
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेच्या सभास्थळावरून निघताना खासदार शरद पवार यांना मराठा समाजातील तरुणांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागले आहे. पुण्यातील अलका चौकामध्ये मराठा समाजातील तरुणांनी हातामध्ये काळे झेंडे घेऊन शरद पवार गो बॅक अशा घोषणा दिल्या. मराठा समाजातील तरुणांवर शरद पवार अन्याय करत आहेत, असे मत या विद्यार्थ्यांनी सीविक मिररशी बोलताना व्यक्त केले.