शाळेतील मुलांच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करा – सुप्रिया सुळे
पुण्यातील सहकारनगर येथील एका नामांकित शाळेमध्ये पहिली ते चौथच्या काही विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याच शाळेमध्ये शिकणाऱ्या दहावी ते बारावी दरम्यानच्या विद्यार्थ्यांनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या विरोधात शेकडो पालकांनी शाळेमध्ये ठिय्या आंदोलन करत प्रकरणाला वाचा फोडली. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटले की, “पुण्यातील एका शाळेत लहान मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून याप्रकरणी पोलीसांनी लक्ष देऊन याची सखोल चौकशी करावी. या प्रकरणातील गुंतागुंत लक्षात घेता समुपदेशनाची देखील येथे आवश्यकता आहे. पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे पोलीस आयुक्त यांनी याप्रकरणी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी.”
“यासोबतच राज्य शासनाने देखील शालेय मुलांसाठी समुपदेशनाबाबत एक कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. यासाठी या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था, तज्ज्ञ व्यक्ती, मानसोपचारतज्ज्ञ आदींची बैठक घेऊन याबाबत सकारात्मक विचार करुन निर्णय घ्यावा”, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
पुण्यातील एका शाळेत लहान मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून याप्रकरणी पोलीसांनी लक्ष देऊन याची सखोल चौकशी करावी. या प्रकरणातील गुंतागुंत लक्षात घेता समुपदेशनाची देखील येथे आवश्यकता आहे.
— Supriya Sule (@supriya_sule) October 10, 2023
पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे पोलीस आयुक्त…
दरम्यान, पालकांनी चार दिवसांपूर्वी या प्रकरणाबाबत मुख्याध्यापिकेकडे तक्रार केली होती. परंतु, त्यांनी कोणतीही दखल घेतली नव्हती. शेवटी पालकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. त्यानंतर, प्रशासनाने तातडीने मुख्याध्यापिकेला निलंबित केले असून विभागप्रमुखांची बदली केली आहे. दरम्यान, या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून चार अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.