Neelam Gorhe : पोलिसांनी बेघर, निराधार महिलांना आधार गृहात दाखल करावे - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवावे आणि स्वतःहून रस्त्यावर भटकणाऱ्या मुलींना आधार गृहात दाखल करावे अथवा त्यांना त्यांच्या घरी, गावी पाठवण्याची व्यवस्था करावी असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 7 Oct 2023
  • 12:54 pm
 Neelam Gorhe : पोलिसांनी बेघर, निराधार महिलांना आधार गृहात दाखल करावे - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीसांसोबत लवकरच विधानभवनात भवनात बैठक घेणार

लोणावळ्यात अल्पवयीन मुलींवर तसेच रस्त्यावर भटकणाऱ्या मुलीवर अत्याचार घडल्याचे प्रकार समोर आले आहेत. रस्त्यांवर सीसीटीव्ही आहेत त्याद्वारे पोलिसांनी अशा मुलींवर लक्ष ठेवणे आवश्यक असताना तसे झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवावे आणि स्वतःहून रस्त्यावर भटकणाऱ्या मुलींना आधार गृहात दाखल करावे अथवा त्यांना त्यांच्या घरी, गावी पाठवण्याची व्यवस्था करावी असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आज लोणावळा येथील शासकीय विश्रामगृहात श्री. सत्यसाई कार्तिक सहायक पोलीस अधीक्षक, श्री. किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक लोणावळा ग्रामीण, श्री. सीताराम डुबल पोलिस निरीक्षक लोणावळा शहर  यांच्यासोबत बैठक घेत लोणावळ्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महिलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने लवकरच विधानभवनात रेल्वे पोलीस आणि लोणावळा पोलिसांची बैठक घेणार आहोत. यामध्ये ज्या महिला रेल्वे, बसने प्रवास करत आहेत त्या महिलांना सुरक्षेच्यादृष्टीने एक माहिती पत्रक देण्यात यावे. ज्याद्वारे त्यांना काही अडचण आली तर ते तात्काळ पोलिसांशी संपर्क करू शकतात. तसेच लोकलमधील महिलांच्या डब्यात, रेल्वे स्थानकावर जास्तीच्या महिला पोलिसांची नेमणूक करण्यात यावी. याशिवाय त्यांनी रेल्वे स्थानकावरील भटक्या, बेघर महिलांना आधार गृहात, बाल गृहात पाठविण्याची व्यवस्था करावी. असे सांगितले. तसेच याबाबत विधानभवनात बैठक घेऊन आढावा घेणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

लोणावळ्यामधील अत्याचाराच्या प्रकरणातील अजून पाच आरोपी सापडलेले नाहीत. त्यांना लवकरात लवकर शोधण्यासाठी पोलिसांनी दोन पथकं तैनात केली असल्याचे सांगितले आहे. ज्या दोन मुलांनी अत्याचारित मुलींची सुटका केली त्या मुलांना देखील पोलिसांच्यावतीने प्रोत्साहनपर मदत करण्यात येणार आहे. ज्या अत्याचारित मुली शाळेत शिक्षण घेत आहेत त्यांना उपसभापती, स्त्री आधार केंद्राची अध्यक्ष आणि शिवसेना नेता यानात्याने शालेय उपयोगी मदत करण्यात येणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच पोलिसांनी भरोसा सेलच्या माध्यमातून दर महिन्याला अत्याचारित मुलींशी संपर्क करून त्यांचा आत्मविश्वास वाढवावा, त्यांची विचारपुस करून त्यांना काही मदत लागत असल्यास आमच्याद्वारे, स्वयंसेवी संस्थांद्वारे अथवा सरकारच्या माध्यमातून मदत करावी. जेणेकरून त्या मुलींच्यात त्या एकटे असल्याची भावना निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

नवरात्रीच्या आधी एकविरा देवी मंदिर आणि परिसरात योग्य ती दक्षता घ्यावी...

एकविरा देवी देवस्थान आणि पोलीस प्रशासनाच्यावतीने मंदिर परिसरात भाविकांसाठी योग्य पावले उचलली गेली आहेत. असे असले तरी नवरात्रात यंत्रणा कोलमडल्यासारखी दिसते त्याकरिता प्रशासनाने नवरात्राआधीच योग्य ती दक्षता घेण्याचे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

ग्रामीण भागात ‘महिला शिवदूत’ नेमणार...

काल वर्षा बंगल्यावर खासदार श्री. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. त्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ‘महिला शिवदूत’ नेमण्याचे ठरले. या  महिला शिवदूतांच्या मार्फत स्त्री शक्ती योजना राबविली जाणार आहे. यामध्ये शासनाच्या २२ प्रकारच्या योजना महिलांसाठी राबविण्यात येणार असून स्त्री सशक्तीकरण करण्यात येणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest