Pimpri Chinchwad: विधानसभेच्या तिकिटासाठी इच्छुकांची धावपळ सुरू

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आचारसंहिता जाहीर होऊन निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ जवळ येत आहे. त्यातच पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेत इच्छुकांची आपल्या पक्षश्रेष्ठींकडे तिकीट मिळवण्यासाठी धावपळ सुरू आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

महायुती-महाविकास आघाडीतील पक्षश्रेष्ठींसह इतरांकडेही चाचपणी, तिकीट मिळवण्याबरोबरच कापण्यासाठीही जोरदार फिल्डिंग

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आचारसंहिता जाहीर होऊन निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ जवळ येत आहे. त्यातच पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेत इच्छुकांची आपल्या पक्षश्रेष्ठींकडे तिकीट मिळवण्यासाठी धावपळ सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत, तर बंडखोरी होऊ नये म्हणून अस्ते कदम पाऊल टाकले जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांकडून पक्षश्रेष्ठींचे उंबरठे झिजवण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर तिकीट मिळवण्यासह प्रबळ विरोधकांचे तिकीट कापण्यासाठीही फिल्डिंग लावली जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.  

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघासह मावळ विधानसभेत कोणाला उमेदवारी मिळणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे. उमेदवार निश्चित झाल्यानंतर लढतीचे चित्र अधिक स्पष्ट होऊन प्रचाराची रंगत आणखी वाढणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता मंगळवारी (दि. १५) लागू झाली आहे, तर २२ आॅक्टोबर ते २९ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. अर्जांची

छाननी ३० तारखेला होईल. ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष रिंगणात किती उमेदवार असणार त्यावरून निवडणुकीची लढत दुरंगी की तिरंगी होणार, हे चित्र स्पष्ट होणार आहे.

प्रमुख लढत महायुती-महाविकास आघाडीत
विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख आघाडींमध्ये लढत रंगतदार होईल. असे चित्र आहे. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी व इतर पक्षाचे उमेदवारही निवडणुकीत दिसतील. पक्षाच्या उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा असल्याने बंडखोर तसेच, अपक्षांचा भरणा असणार आहे. महायुती व महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाकडे जागा जाणार... यांची उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रत्येक पक्ष पिंपरी, चिंचवड व भोसरीसह मावळ मतदारसंघावर दावा करीत आहे. पक्षाचे इच्छुक तसेच, पदाधिकारी त्या दृष्टीने दावे करीत आहेत. इच्छुकांकडून तिकीट पक्के करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यासह मुंबईच्या वार्‍या वाढल्या आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून दबावतंत्रांचा वापर करीत तसेच, शिफारस करण्याचे तंत्र वापरले जात आहे.  

पिंपरीत आण्णा विरोधात कोण?
शहरातील पिंपरी हा मागासवर्गीय राखीव मतदारसंघ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा तेथे आमदार आहे. महायुतीमधून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटणार आहे, तर महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाकडे ही जागा जाईल, याबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्याबाबत मतदारसंघात जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, महायुतीकडून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहावे लागणार आहे.

महायुतीत दीर-भावजयीत दिलजमाई
राज्यात दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या चिंचवडची जागा भाजपकडे आहे. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्या इच्छुकांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचा सपाटा लावला आहे. पक्षाकडेही उमेदवारीची मागणी केली आहे. महायुतीत भाजपचा मतदारसंघ असल्याने विद्यमान आमदार अश्विनी जगताप आणि शहराध्यक्ष शंकर जगताप हे दोघे सुरुवातीला इच्छुक होते. मात्र, दोनच दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांची भेट घेत विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांनी दीर शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे, तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षापैकी कोणाला जागा सुटणार याचे वेगवेगळे दावे केले जात आहेत. तुतारी हाती घेण्यासाठी अनेकांनी थेट मैदानात उतरून शड्डू ठोकले आहेत, पण महाविकास आघाडीकडून चिंचवड हा मतदारसंघ शिवसेना (उबाठा) गटाला सुटल्याच्या चर्चेने मोठा टिस्ट् पाहायला मिळत आहे.

भोसरीत मविआचा तिढा सुटेना
भोसरी मतदारसंघही भाजपकडे आहे. भाजपच्या हातातून मतदारसंघ काढून घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून एकजूट दाखवत लढण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासह शरदचंद्र पवार पक्षाचे इच्छुक तयारीला लागले आहेत. मात्र, महाविकास आघाडीत अद्याप निर्णय न झाल्याने या मतदारसंघाची जागा कोणत्या पक्षाला सुटणार हे स्पष्ट झाले नाही. तिकीट न मिळाल्याने नाराज व बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीस बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मावळात सांगली पॅटर्नची चर्चा
मावळ विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस (एपी) गटाकडे आहे. त्या मतदारसंघावर महायुतीतील भाजपने दावा केला आहे, तर महाविकास आघाडीत सक्षम उमेदवार देण्याबाबत पर्यायाची चाचपणी सुरू आहे. महायुतीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून सुनील शेळके यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. पण, भाजपसह राष्ट्रवादी (अजित पवार) गटात बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण? गुलदस्त्यात ठेवला आहे. पण, मावळात आताच सांगली लोकसभा निवडणूक झालेल्या निकालाचा पॅटर्न राबवण्याची चर्चा रंगली आहे.

शह-काटशहाचे डावपेच सुरू 
विधानसभा निवडणुकीत आपल्यालाच तिकीट मिळावे म्हणून महायुती आणि महाविकास आघाडीतील काही इच्छुकांनी तिकिटासाठी पक्षाच्या वरिष्ठांकडे गळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी इच्छुकांनी मुंबई, नागपूरसह दिल्लीच्या अनेक चकर्‍या मारल्या जात आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून वरिष्ठांशी संवाद साधत आपणच कसे योग्य व सक्षम आहोत, याचे दाखले दिले जात आहेत, तर संबंधितांनी उमेदवारी देऊ नये म्हणूनही अनेक जण रिंगणात उतरले आहेत. घराणेशाही, एकाच कुटुंबाला वारंवार संधी, निष्क्रियता, लोकांत न मिसळणे, निवडणुका झाल्यानंतर गायब होणे, पक्ष कार्यक्रम व संघटनेत सक्रियपणे सहभागी न होणे आदी कारणे पुढे करीत संबंधिताला तिकीट देऊ नये म्हणून पक्षांच्या नेत्यांना धमकीवजा इशारा देण्यात येत आहे. या शह-काटशहच्या डावपेचात कोणाला यश मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest