गहुंजेतील क्रिकेट स्टेडियमला शरद पवारांचे नाव द्या – धनंजय मुंडे
पद्मविभूषण शरद पवार यांचे क्रिकेट विश्वात मोठे योगदान आहे. साहेबांच्या या योगदानाचा सन्मान म्हणून पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानास शरद पवारांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांच्याकडे केली आहे.
याबाबत धनंजय मुंडे यांनी रोहित पवार यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये आयपीएलच्या धर्तीवर एमपीएल या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल रोहित पवारांचे आणि त्यांच्या टीमचे धनंजय मुंडे यांनी कौतूकही केले आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, क्रिकेट हा आपल्या भारतीयांचा श्वास आहे, क्रिकेटचा सामना सुरू असताना प्रत्येक क्षणाला भरलेला उत्साह भारतीयांच्या नसानसातून वाहतो, हे आपण जाणतो. याच क्रिकेट विश्वात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेचे आयोजन केले व महाराष्ट्रातील खेळाडूंना उच्चस्तरावर संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपले मनस्वी अभिनंदन.
पद्मविभूषण आदरणीय @PawarSpeaks साहेबांचे क्रिकेट विश्वात मोठे योगदान आहे. साहेबांच्या या योगदानाचा सन्मान म्हणून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (गहुंजे) आंतरराष्ट्रीय मैदानास आदरणीय साहेबांचे नाव देण्यात यावे अशी मागणी एमसीएचे अध्यक्ष आमचे बंधू आ. @RRPSpeaks दादांकडे… pic.twitter.com/Ucag2XFlTf
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 16, 2023
भारतीय क्रिकेट विश्वाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्र पवारांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय ते अगदी आयसीसीच्या अध्यक्ष पदावर आदरणीय साहेबांनी काम केले. भारताच्या महिला क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जा व संधी मिळवून देणे, देशासाठी खेळलेल्या क्रिकेटपटूना निवृत्ती नंतर पेन्शन मिळवून देणे याप्रकारच्या अनेक सोयी-सुविधा व संधी आदरणीय क्रिकेटर्सला मिळवून दिल्या. क्रीडा विश्वातील खो-खो, कबड्डी सारख्या मातीतील खेळांना आंतरराष्ट्रीय दर्जा साहेबांमुळेच मिळाला.
साहेबांचे क्रिकेट व क्रीडा विश्वातील योगदान सांगायचे म्हटल्यास एक संपूर्ण पुस्तक लिहून तयार होईल, इतके आहे, हे आपणही जाणता! साहेबांच्या या कार्याचा अभिमान आपल्या सर्वांनाच आहे. याच कार्याचा सन्मान म्हणून पुण्यातील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानास पद्मविभूषण, शरदचंद्रजी पवार साहेबांचे नाव देण्यात यावे, अशी विनंती मी आपणास करत आहे, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.