ललित पाटीलने दोन मंत्र्यांसह भाजप पदाधिकाऱ्यांना दुबईत पार्ट्या दिल्या, सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट
‘ससून ड्रग्स प्रकरणात मंत्री दादा भुसे यांच्यासह दोन मंत्री, काही आमदार आणि भाजपच्या लोकांचा समावेश आहे. या सगळ्या लोकांच्या दुबईत पार्ट्या झाल्या. या पार्ट्या ललित पाटीलने दिल्या होत्या. याची सगळी माहिती आम्हाला आहे. ललित पाटील अनेक दिवसांपासून ससून जवळच्या हॉटेलमध्ये राहत होता. मात्र कुणाच्या नावावर राहत होता,’ असा गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
ड्रग्स तस्कर ललित पाटीलने पोलीसांच्या हातावर तुरी देऊन ससून रुग्णालयातून धुम ठोकल्यानंतर प्रकरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेत्यांमध्ये देखील आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. ड्रग्ज प्रकरण मंत्री दादा भुसे यांचा सहभाग असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता. आज त्यांना पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आणखी एक नवा गौप्यस्फोट केला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, “आम्ही अनेक गोष्टींचा पाठपुरावा करत आहोत. यात आम्हाला राजकरण आणायचं नाही. ललित पाटील याच्यावर काय उपचार सुरू होते याची माहिती द्या. गृहमंत्री आम्हालाही कायदा माहिती आहे. कुठली माहिती गोपनीय आणि कुठली ओपन करावी हे आम्हाला माहिती आहे. देशाच्या सुरक्षेच्या संबंधित माहिती सांगता येत नाही, ललित पाटील प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलाय हे सांगू नका. पण उपचार काय सुरू होते हे तरी सांगा.”
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “या प्रकरणात ससून रुग्णालयातील डीन संजीव ठाकूर यांना पदावर राहण्याचा आधिकार नाही. विवेक अरहाना याचंदेखील या प्रकरणी नाव येत आहे. एक आणि दोन वर्ष हे कैदी नेमके कशावर उपचार घेत असतात, याची माहिती दिली पाहिजे. या प्रकरणी जो चालक पोलिसांची ताब्यात घेतला आहे तो अरहना यांचा चालक आहे. एवढे दिवस झाले पण राज्याचे गृहमंत्री यावर काहीही बोलायला तयार नाहीत. हे सगळे प्रकरण रफादफा करण्याचं काम सुरू आहे.”
“संजीव ठाकूर यांचे निलंबन करा आणि त्यांची नार्को टेस्ट करा. त्यानंतरच या प्रकरणात अनेक मंत्र्यांची नावे समोर येतील. संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करा अन्यथा या सगळ्या प्रकरणी महविकास आघाडी २४ तारखेला रस्त्यावर उतरून मोर्चा काढणार, २४ तारखेनंतर संजीव ठाकूर यांना आम्ही कामं करु देणार नाही”, असा इशारा देखील सुषमा अंधारे यांनी यावेळी बोलताना दिला.