आमदार रवींद्र धंगेकर
मोना येनपूूरे
गेल्या अनेक दिवसांपासून ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. ललित पाटील याला अटक करून सहा दिवस झाले आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची चौकशी केली जात नसल्याचा आरोप कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केली आहे. ललित पाटील प्रकरणाची चौकशी केंद्रीय यंत्रणांकडून (central agencies) करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी सीविक मिररशी बोलताना केली.
ललित पाटील यांचा एन्काऊंटर करून नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची शंका देखील त्यांनी व्यक्त केली आहे. रवींद्र धंगेकर म्हणाले की, ललित पाटील हा पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर मुंबई पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे. ललित पाटील पळून गेला त्यावेळी त्याला मदत करणाऱ्या पोलिसांना देखील अजून अटक झालेली नाही. ससून रुग्णालयाचे डिन तसेच इतर डॉक्टरांची देखील पोलिसांकडून चौकशी होत नसल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जात आहे.
दरम्यान, पुण्यातील ससुन रुग्णालयातून पळून गेलेल्या ललित पाटीलवर एक दोन नव्हे तर सहा डॉक्टर उपचार करत होते. मात्र सहा डॉक्टरांकडून उपचार घेण्याएवढे ललित पाटीलला आजार तर कोणते होते त्याच्यावर उपचार करणारे ते सहा डॉक्टर कोण याबाबत माहिती देण्यास ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांनी नकार दिला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू असल्याचे प्रकार दिसून येत आहे.