संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील तीव्र मतभेद चव्हाट्यावर आले असून आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत. महाविकास आघाडीत पाडापाडीचा खेळ रंगणार असून, आघाडी सांभाळू न शकणारे हे तीन पक्ष महाराष्ट्र काय सांभाळणार, असा प्रश्न निवडणुकीपूर्वीच विचारला जाऊ लागला आहे.
सध्या महाविकास आघाडी जागावाटपाचे गुऱ्हाळ अजून सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उजाडला तरी तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या दरम्यान जागा वाटपाला अंतिम स्वरूप येऊ शकलेले नाही. विशेषतः काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांमध्ये वाद शिगेला गेला असून दोन्ही पक्षांच्या नेत्यादरम्यान चांगलीच बाचाबाची झाल्याची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे. त्यातूनच एकमेकांना सोडलेल्या जागावर देखील उमेदवार उभे करण्यात येत असून, काँग्रेसने अनेक ठिकाणी "सांगली पॅटर्न" राबवण्याचा निर्धार केल्याची चर्चा सुरू आहे. शरद पवार या वादापासून दूर राहत असले तरी अनेक ठिकाणी त्यांच्या उमेदवारांचाही कात्रज घाट केला जाणार असल्याचे दिसून येत आहे.
परस्परांच्या विरोधात उमेदवारी दाखल
महाविकास आघाडीने परांडा, दक्षिण सोलापूर, दिग्रस आणि मिरज या चार ठिकाणी एकमेकांच्या विरोधातच उमेदवार उभे केले आहेत. दिग्रस मध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे तानाजी सातपुते यांच्या विरोधात काँग्रेसने मोहन वानखेडे यांना मैदानात उतरवले आहे. सोलापूर दक्षिण मध्ये उद्धव ठाकरे गटाचे अमर पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे दिलीप माने यांनी अर्ज भरला आहे. धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या रणजीत पाटील यांच्या विरोधात राहुल मोटे यांना उमेदवारी मिळाली आहे. भायखळा विधानसभा मतदारसंघात उबाठा गटाचे मनोज जामसुतकर यांच्या विरोधात काँग्रेसचे मधू अण्णा चव्हाण यांनी उमेदवारी दाखल केली आहे. तर अहिल्यानगर शहर ची जागा संजय राऊत यांनी पैसे घेऊन शरद पवार गटाला विकली असा आरोप उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकच करू लागले आहेत. दुसरीकडे काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या विरोधात स्थानिक नेते नाराज झाले असून त्यांनी पक्षाच्या कार्यालयावरच दगडफेक करण्यापर्यंत हिम्मत दाखवली आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघातील उमेदवार बदलण्याची परिस्थिती काँग्रेस पक्षावर आली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत काही मुद्रणदोष झाले असून ती सुधारण्याची आवश्यकता असल्याचे उबाठा गटाकडून सुरुवातीला सांगण्यात आले. म्हणजेच काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांच्या पक्षांतर्गतच प्रचंड मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीत प्रमुख पक्ष असलेल्या तीन पक्षांची ही अवस्था असताना मित्र पक्षांची अवस्था मात्र त्याहून अधिक बिकट झाली आहे.
शेकाप, समाजवादी यांचे "एकला चलो रे"
शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष हे महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहेत. मात्र जागावाटप करताना या पक्षांचा साधा विचार देखील करण्यात आलेला नाही. समाजवादी पक्ष इच्छुक असलेल्या जागावर महाविकास आघाडीने आपले उमेदवार दिले आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव परस्पर उमेदवार या जाहीर करून मोकळे झाले आहेत. मालेगाव मध्य या विधानसभा मतदारसंघात एकगठ्ठा मतदानामुळे भाजपचे दीड लाखाहून अधिक आघाडीवर असलेले सुभाष भामरे पराभूत झाले होते. त्याच मतदारसंघात आता समाजवादी पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे तसेच धुळे शहर मतदार संघात देखील समाजवादी पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरला आहे. भाजप आपल्या मित्र पक्षांना दगा देतो असा आरोप महाविकास आघाडीचे नेते करीत असतात. पण आज महाविकास आघाडी सोबत असलेल्या पक्षांना एक जागा सोडण्याची तसदी सुद्धा मोठ्या पक्षाने घेतलेली नाही.रायगड जिल्ह्यातील उरण,, नांदेड जिल्ह्यातील लोहा या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाची ताकद आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघात देखील शेतकरी कामगार पक्ष मजबूत स्थितीत आहे. मात्र तरीही येथे महाविकास आघाडीतील दादा पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले अन्य पक्ष नाराज झाले असून त्यांनी स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण केली आहे.
नाना पटोले, संजय राउत यांच्या दरम्यान "बाचाबाची?"
जागा वाटपाच्या चर्चेच्या दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उबाठा गटाचे संजय राऊत यांच्यात जोरदार चकमक झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. उबाठा गटाचे नेत्यांनी मुख्यमंत्री पदासाठी परस्पर उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू केली आहे. काँग्रेसची मात्र या विषयावर पूर्ण नाराजी आहे. निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची परंपरा काँग्रेसमध्ये नाही, असे माजी मुख्यमंत्री आणि गांधी परिवाराचे निकटवर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी आधीच स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग करण्याकरिता उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबासहित दिल्ली दौरा केला होता. तेव्हापासून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात विस्तवही जात नाही अशी परिस्थिती आहे. विदर्भात काँग्रेसची चांगली परिस्थिती असतानाही तेथे उद्धव ठाकरे गटाचे नेते आपल्या गटाची उमेदवारी दमटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर मुंबई शहर मधून काँग्रेसला हद्दपार करण्याची संपूर्ण रणनीती उद्धव ठाकरे यांनी आखली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यात काँग्रेसच्या हाताला काहीही लागलेले नाही त्यामुळे तळकोकणातील या तिन्ही जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत.
हरियाणाच्या निकालांचा परिणाम
लोकसभा निवडणुकीत चांगल्या जागा मिळाल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आत्मविश्वास संचारला होता. पण हरियाणाचे निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे अवसान गळाले आहे. त्याचाच अवाजवी फायदा घेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटाचे नेते करीत असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडी जिंकण्याची शक्यता असलेल्या अनेक मतदार संघामध्ये अपक्ष उमेदवारांचे पेव फुटले असून हे अपक्ष उमेदवार महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीत एकास एक अशी लढत झाली होती. त्यामुळे हिंदुत्ववादी विरोधी मतांचे ध्रुवीकरण झाले आणि महाविकास आघाडीच्या जास्त जागा निवडून आल्या. पण विधानसभा निवडणुकात घटक पक्षानी अधिकचा वाटा मागण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या रिंगणात अधिक ताकतीने ण उतरलेला एम आय एम पक्ष आणि समाजवादी पक्ष आता ताकतीनिशी मैदानात उतरण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. आम आदमी पक्षानेही लोकसभा निवडणुकीत शक्तीनिशी उमेदवार उतरवले नव्हते. त्यातही महाराष्ट्रात काही जिल्ह्यात असलेल्या स्थानिक नेतृत्वांच्या महत्त्वाकांक्षाना धुमारे फुटले आहेत .त्यामुळेच महाविकास आघाडी दोलायमान झालेली आहे. अधिकृतपणे महाविकास आघाडी फुटली असे जाहीर करण्यात आलेले नसले तरी राज्यभरातील विविध मतदारसंघात रिंगणात उतरलेल्या उमेदवारामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आघाडी पवारांच्या नियंत्रणाच्या बाहेर!
"महाराष्ट्र माझा हाती सोपवा मला महाराष्ट्र सुधरवायचा आहे", अशी घोषणा राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली होती. मात्र निवडणुकीआधीच महाविकास आघाडीचे घटक पक्ष त्यांच्या नियंत्रणाच्या बाहेर गेले आहेत. मित्रपक्षांना देण्यात आलेल्या अवाजवी महत्त्वामुळे काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी पक्षाच्या निवडणूक समितीच्या बैठकीतूनच उठून गेले अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाला अति आत्मविश्वासाची बाधा झाल्यामुळे त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही अहंगंड जागा झाला आहे. त्यामुळेच नेत्यांच्या आशीर्वादाने अनेकांनी बंडाचे निशाण फडकवले आहे.
महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीत अधिक समन्वय
दुसरीकडे महायुतीमध्ये प्रचंड समन्वय दिसून येत आहे. भाजपने आपले अनेक स्थानिक नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला देऊ केले आहेत. आमदार राजेंद्र राऊत, माजी खासदार संजय काका पाटील, भाजपचे अंधेरी पूर्व मधील कार्यकर्ते मुरजी पटेल, भाजपचे खासदार नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे या आणि अशा अनेक नेत्यांचा त्यामध्ये समावेश आहे. कार्यकर्ता दुसऱ्या पक्षात गेला तरी चालेल परंतु महायुतीची जागा निवडून आलीच पाहिजे, याची खबरदारी महायुतीचे नेते घेत आहेत. म्हणूनच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीपेक्षा महायुतीचे पारडे समन्वयामुळे सध्या तरी जड झाल्याचे दिसून येत आहे.