संग्रहित छायाचित्र
लातूर : दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Chakurkar) या दोन नेत्यांमुळे लातूरची आजही राजकीय वर्तुळात ओळख आहे. विलासरावांनी राज्यात तर शिवराज पाटील यांनी केंद्रात लातूरचे प्रतिनिधित्व केले आहे. विलासराव देशमुखानंतर अमित देशमुख (Amit Deshmukh) त्यांचा राजकीय वारसा चालवत आहेत. अमित २००९ पासून लातूर शहराचे आमदार आहेत. तर त्यांचे लहान भाऊ धीरज देशमुख मागील विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. आता भाजपने अमित देशमुखांच्याविरोधात अर्चना पाटील चाकूरकरांना तर लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुखांच्याविरोधात (Dhiraj Deshmukh) रमेश कराड (Ramesh Karad) यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत भाजप आणि काँग्रेसमध्ये होणाऱ्या सेटिंगला यंदा पहिल्यांदाच फाटा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
अर्चना पाटील (Archana Patil) २०१९ साली लातूर ग्रामीणमधून विधानसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होत्या. पण, काँग्रेसने त्यांची निराशा करत धीरज देशमुखांना उमेदवारी दिली. या सेटबॅकनंतरच त्यांना पक्षात आणण्यासाठी भाजपा नेते प्रयत्नशील होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्चना पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये यावे यासाठी आम्ही पाच ते सात वर्षांपासून प्रयत्न करत होतो. त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू होता, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला होता. अर्चना पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतरच त्या अमित देशमुखांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणार ही शक्यता व्यक्त करण्यात येत होती. भाजपने तिसऱ्या यादीमध्ये त्यांचा समावेश करत त्यावर शिक्कामोर्तब केले. लातूर (Latur) विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे. अर्चना पाटील त्याच समाजातील आहेत. या मतदारांनी शिवराज पाटील यांना नेहमीच साथ दिलीय. विलासराव देशमुखांच्या १९९९ साली झालेल्या पराभवात लिंगायत मतदारांची भूमिका निर्णायक ठरली होती. अमित देशमुख हे मराठा उमेदवार आहेत. त्याचबरोबर जरांगे फॅक्टरचाही भाजपला धोका आहे. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी लिंगायत समाजातील तगडा उमेदवार देऊन भाजपने मोठी राजकीय चाल खेळली आहे. अर्चना पाटील यांची स्वच्छ राजकीय प्रतिमा, सामाजिक कामातील त्यांचा सक्रीय सहभाग तसंच एक सुशिक्षित महिला म्हणून मतदारांवर असलेली छाप हे फॅक्टरही या निवडणुकीत महत्त्वाचे ठरु शकतात. लातूर शहरात भाजपचीही पारंपारिक मते आहेत. त्यांचा देखील अर्चना पाटील यांना फायदा होणार आहे.