इंदापूरात 'दोघांत तिसरा', प्रवीण माने या नव्या भिडूमुळे दोन तगड्या उमेदवारांत धाकधूक

भाजपमध्ये जाऊन आता शांत झोप लागते हे सांगणाऱ्या हर्षवर्धन पाटलांनी जागावाटपात ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाणार म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. तर अजित पवारांनी विद्यमान आमदार दत्तामामा भरणेंना पुन्हा मैदानात उतरवले.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे जिल्ह्यातील पण बारामतीच्या शेजारी असलेली इंदापूर मतदारसंघातील लढत ही सगळ्यांच्याच उत्सुकतेचा विषय आहे. यावेळी या मतदारसंघात तीन उमेदवार मैदानात उतरले आहेत. भाजपमध्ये जाऊन आता शांत झोप लागते हे सांगणाऱ्या हर्षवर्धन पाटलांनी जागावाटपात ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाणार म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. तर अजित पवारांनी विद्यमान आमदार दत्तामामा भरणेंना पुन्हा मैदानात उतरवले. दोन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढा होणार असे चित्र असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीटाची अपेक्षा असणाऱ्या सोनाई उद्योगसमूहाच्या प्रवीण माने यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.  

या पार्श्वभूमीवर इंदापुरात पहिल्यांदाच म्हणजे १९९५ नंतर तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. प्रवीण माने यांच्या उमेदवारीने हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे या दोघांनाही धडकी भरली असल्याचे चित्र आहे.  प्रवीण माने कोणाची मते खेचतात की प्रवीण मानेच जायंट किलर होतात? याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या सहानुभूती मिळवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे रडगाणे सुरू झाले आहे.

सलग दहा वर्षांच्या कामकाजामुळे येणारी नकारात्मकता आणि आपल्या कार्यकर्त्या ठेकेदारांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या विकासकामांमुळे दत्तात्रय भरणे यांच्याबद्दल नाराजी आहे. भरणेंच्या कार्यकाळात शहरात विकासकामे झाली, मात्र थे देताना दुजाभाव झाल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. याखेरीज शहरात दादागिरी, गुंडगिरी वाढल्याबद्दलही संताप व्यक्त करण्यात येत आहे. विरोधात बातम्या देणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीला धमकावण्याचे आरोपही त्यांच्यावर झालेले आहेत. त्यामुळे यांच्याबद्दलही जनतेच्या मनात रोष आहे. सोनाई दूध संघाचे संचालक प्रविण माने यांनी शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकीत मदत केली. त्यामुळे विधानसभेला तिकीट मिळणार असल्याचा विश्वास प्रविण माने यांना होता. मात्र ऐनवेळी हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेत तिकीट दिल्याने प्रविण माने नाराज झाले आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.

अटीतटीची लढत
२०१९ ला इंदापूरमध्ये दत्ता भरणे विरूद्ध हर्षवर्धन पाटील अशी लढत झाली. यावेळी अत्यंत अटीतटीची लढत झाली. यात दत्तात्रय भरणे यांचा विजय झाला. दत्ता भरणे यांना १ लाख १४ हजार ९६० मते मिळाली. तर हर्षवर्धन पाटील यांना १ लाख ११ हजार ८५० मते मिळाली. ३ हजार ११० मतांनी दत्ता भरणे यांचा विजय झाला. आता मतदारसंघात तीन उमेदवार मैदानात असतील तर मतविभागणी निर्णायक ठरू शकते. त्यातही जरांगे फॅक्टरमुळे इंदापूरातील मराठा समाजाची मते दोन उमेदवारांत विभागली आणि ओबीसी मते एकवटली तर भरणे यांचे पारडे जड होऊ शकते. मात्र तसे घडे याची शाश्वती नाही. हर्षवर्धन पाटी आणि दत्ता भरणे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळलेली जनता नवा पर्याय देऊ शकते.    

१९५२ सालापासून शंकरराव बाजीराव पाटील यांनी इंदापूर तालुक्याचे नेतृत्व केले. १९८० च्या निवडणूकीत राजेंद्रकुमार बाबूराव घोलप हे तालुक्याचे आमदार झाले. तर १९८५ ते १९९५ या दशकात गणपतराव सीताराम पाटील यांच्या हाती जनतेने इंदापूर तालुक्याची सूत्रे सोपवली. यानंतर १९९५ पासून हर्षवर्धन पाटील नावाचे पर्व इंदापूर तालुक्यात सुरू झाले. १९९५ ला हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्याची पहिली निवडणूक अपक्ष लढवली. त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांचे चिन्ह हे भिंतीवरील घड्याळ होते. त्यानंतर १९९९ आणि २००४ ला हर्षवर्धन पाटील यांनी विमानाच्या चिन्हावर अपक्ष म्हणून इंदापूर विधानसभेची निवडणूक लढवली. विजयी होत थेट विधीमंडळात पोहचले. तर २००९ ला हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस पक्षातून निवडून आले होते.इंदापूरचे नेते स्व. शंकरराव पाटील हे नाव नवे नाही.

दलबदलू प्रतिमा ठरणार मारक?
महाराष्ट्रातही सहकार क्षेत्रात याच शंकरराव पाटलांचे नाव मोठे होते. दोन वेळा खासदार, सहा टर्म आमदार, कट्टर काँग्रेसी अशी त्यांची ओळख. बारामतीचे शरद पवार आणि इंदापूरचे शंकरराव पाटील एकाच विचारसरणीचे नेते. पण शंकरराव पाटलांना खुद्द शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत दोनवेळा पराभूत केल्याचा इतिहास आहे. पाटील-पवार घराण्यात चार दशकांचा संघर्ष होता. प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्राने हा संघर्ष अनेक वेळा पाहिलाय. पुढे शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि काँग्रेसमध्येच राहिलेल्या शंकररावांचा राजकीय वारसा त्यांच्या पुतण्याच्या खांद्यावर आला. तो पुतण्या म्हणजे हर्षवर्धन पाटील. पुढे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी झाल्यानंतर हा संघर्ष छुप्या पद्धतीने पुढे सुरू राहिला. काँग्रेसमध्ये असताना हर्षवर्धन पाटील हे एकेकाळचे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार. त्यावेळी अजित पवारांच्या माध्यमातून खेळी करत पवारांनी त्यांचा वारू रोखला आणि विधानसभेला सलग दोन वेळा त्यांचा पराभव केला. पवार-पाटील घराण्यातील राजकीय वैर जोपासण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांचे स्पर्धक विलासराव देशमुखांशी जवळीक साधली. हे वैर ठाऊक असणाऱ्या विलासराव देशमुखांनी हर्षवर्धन पाटलांशी स्नेह प्रस्थापित करत त्यांना झुकते माप दिले. त्यांच्याकडे राज्यातील अनेक महत्त्वाची खाती सोपवली. नंतरच्या काळात हर्षवर्धन भाजपवासी झाले. तिथेही त्यांना साजेसा सन्मान देण्यात आला. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी त्यांची वर्णी लावण्यात आली. आता तेच हर्षवर्धन पाटील काँग्रेसमधून व्हाया भाजप शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शंकरराव पाटलांच्या पुतळ्यासमोरच्या मैदानात शरद पवार उपस्थित होते. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटलांना पक्षनिष्ठा, विचारसरणी याबाबत बोलण्याचा हक्क राहिला नसल्याची भावना इंदापूरकर व्यक्त करत आहेत.


१९९५- हर्षवर्धन पाटील

१९९९- हर्षवर्धन पाटील

२००४- हर्षवर्धन पाटील

२००९- हर्षवर्धन पाटील

२०१४- दत्तात्रय भरणे

२०१९- दत्तात्रय भरणे

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest